२८ लाखांची लाच, महिला पोलिस अधिकारी निलंबित:पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश; पदोन्नतीही रद्द
![]()
२८ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अडकलेल्या सहायक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार यांना पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. तोटेवार यांच्यावर एका जमिनीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा आरोप आहे. वैशाली तोटेवार यांची पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलिस दलात पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. बदलीनंतर त्यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतून (EOW) कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र, आता त्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, तोटेवार यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करण्यात आला असून, त्यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावरून निलंबित करण्यात येणार आहे. तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना, त्यांच्याकडे जमिनीच्या एका प्रकरणातील तक्रार अर्ज चौकशीसाठी सोपविण्यात आला होता. या प्रकरणात त्यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने सुरुवातीला दोन लाख रुपये दिले होते. उर्वरित २८ लाख रुपयांची लाच देण्यासाठी तोटेवार यांनी तक्रारदाराला शनिवारी (२ मे) दुपारी बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलजवळ बोलावले होते. ही रक्कम स्वीकारण्यासाठी त्यांनी संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ) या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून तक्रारदाराकडून लाच घेताना चव्हाणला रंगेहाथ पकडले. चौकशीत तोटेवार यांनीच चव्हाणला लाच घेण्यासाठी पाठविल्याचे उघड झाल्यानंतर तोटेवार यांच्यासह चव्हाणला अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही ६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
