मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकीच उरली नाही:एका चिमुकलीवर अत्याचार झाला अन् तुम्ही पेढे वाटताय? नसरापूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा संताप
![]()
पश्चिम बंगालमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत भाजप नेत्यांनी पेढे वाटले आणि जल्लोष केला. मात्र, या जल्लोषावर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. पुण्याच्या नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेची आठवण करून देत, “राज्यात वारंवार अत्याचार सुरू आहे. एका मुलीच़ी बलात्कार करून हत्या झाली आणि तुम्ही पेढे वाटत फिरताय” अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकीच राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. प्रणिती शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “पुरागामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट प्रकारे अत्याचार होऊन हत्या होते. तुम्ही खरे तर त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा केला नसता आणि तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाहीत, असे म्हटले असते, तर तुम्हाला थोडीतरी माणुसकी आहे, असे आम्हाला वाटले असते. पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकीच राहिली नाही, असे मला वाटते. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. भाजपला सत्तेचा हावरटपणा भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना शिंदे म्हणाल्या की, या सरकारला सत्तेशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. “भाजपचे राजकारण केवळ ‘इलेक्शन टू इलेक्शन’ मर्यादित राहिले आहे. सत्तेसाठी त्यांचा हावरटपणा इतका वाढला आहे की, त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पडलेले धिंडवडे दिसत नाहीत. महाराष्ट्रात सध्या वारंवार अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यात नेमके चांगले काय घडतेय? केवळ सत्तेसाठी गुंग असलेले हे सरकार सामान्य माणसाच्या जिवाशी खेळत आहे.” गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी नसरापूर प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी, असा पवित्रा प्रणिती शिंदे यांनी घेतला आहे. “ज्या राज्यात चिमुकल्या सुरक्षित नाहीत, तिथे गृहमंत्री म्हणून तुम्ही काय काम करत आहात? फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हे ही वाचा… नसरापूर प्रकरणात निर्घृणतेची परिसीमा:चिमुरडीच्या मृत्यूमागील भीषण वास्तव समोर; पोस्टमार्टम रिपोर्टमधून गंभीर बाबी उघड पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालात नमूद झालेल्या निरीक्षणांमुळे घटनेचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले असून, या प्रकरणातील क्रौर्य स्पष्ट होते. ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे अहवाल सादर केल्यानंतर या घटनेबाबत पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच या प्रकरणामुळे राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा टीकेच्या केंद्रस्थानी असताना, या नव्या तपशीलांमुळे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सविस्तर वाचा…
