धार्मिक कार्यासाठी कुणी पॅनकार्ड देतं का?:खोटं बोलण्याचा निगरगट्टापणा आणतात कुठून? चाकणकरांच्या दाव्यावर सुषमा अंधारे सवाल
![]()
समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) प्रतिभा चाकणकर यांची प्रदीर्घ चौकशी केली. “धार्मिक कामाच्या नावाखाली आम्ही अशोक खरातला कागदपत्रे दिली आणि फसलो,” असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीदरम्यान केला आहे. मात्र, त्यांचा हा दावा हास्यास्पद असून “खोटं बोलण्यासाठी एवढा निगरगट्टापणा आणतात तरी कुठून?” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी चाकणकर भगिनींवर निशाणा साधला आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. याच अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची नुकतीच चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीत त्यांनी केलेल्या दाव्यांवरून सुषमा अंधारे यांनी चाकणकर भगिनींना धारेवर धरले आहे. नेमके काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे यांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यातील विसंगतीवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, “सामान्यपणे पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो. तिरुपती किंवा शिर्डीसारख्या ठिकाणी निवासासाठी खोल्या हव्या असतील किंवा पूजा-अभिषेक करायचा असेल, तर फार फार तर ओळखपत्र म्हणून आधार कार्डची गरज पडते. पण प्रतिभा चाकणकर म्हणतात की त्यांनी पॅन कार्ड धार्मिक कार्यासाठी दिले होते. पॅन कार्डचा आणि धार्मिक कार्याचा काय संबंध? चुकीचा वापर झाला असे म्हणून त्या आता हात झटकत आहेत, हा निव्वळ खोटेपणा आहे.” रूपाली चाकणकरांच्या ‘सुरक्षित कवचा’वर प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रकरणात रूपाली चाकणकर अजूनही सुरक्षित आहेत, यावरूनही अंधारे यांनी शंका उपस्थित केली. “या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर असताना रूपाली चाकणकर एका सुरक्षित कवचात आहेत. ही नेमकी कुणाची कृपा म्हणावी? सत्तेतील बड्या नेत्यांचा त्यांना वरदहस्त आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भोंदूगिरीच्या धनिकांना चाप लावा अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या विरोधात बोलताना सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “केवळ लहान-सहान भोंदू बाबांना पकडून बातम्यांचा रतीब लावण्यापेक्षा, अशा भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या चाकणकर यांच्यासारख्या धनिक आणि वजनदार लोकांना चाप लावणे गरजेचे आहे. पण पोलीस चाकणकरांना अटक करायला घाबरतात का? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे.” चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकरांनी काय सांगितले? ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी सांगितले की, त्यांनी आपले आणि मुलाचे आधार व पॅन कार्ड तपशील धार्मिक कामासाठी अशोक खरात याला दिले होते. मात्र, या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने त्यांच्या नावावर बनावट खाती उघडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे या खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून खरातचेच नाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच खाते उघडताना मोबाईल क्रमांकही खरातचाच वापरण्यात आल्याचा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला आहे.
