संभाजीनगरमध्ये गॅस टंचाई:तापमान 40 च्या पुढे असताना रणरणत्या उन्हात सिलिंडरसाठी रांगा, अनेकांच्या तब्बल 35 किमीवरून रोज फेऱ्या

0
whatsapp-image-2026-05-05-at-112556-am_1777964352.jpeg




छत्रपती संभाजीनगरमधील लोकांना पुन्हा गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय. शहराचे तापमान तब्बल 40 अंशाच्या पुढे जात आहे. मात्र, अशा रणरणत्या उन्हात लोकांना दिवसभर गॅस सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय. सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळित करावा. सिलिंडर घरपोच द्यावे, अशी मागणी होतेय. अमेरिका आणि इराण युद्धामुळे शहरात गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासनाने सारे काही आलबेल असल्याचे सांगितले. मात्र, अनेक लोकांना गेल्या दोन-दोन महिन्यांपासून सिलिंडरच मिळाले नाही. त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. अनेकजण सिलिंडरसाठी तब्बल 35 किलोमीटर दूरवरून येत आहेत. येथे आहेत रांगा छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास जवळच्या सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनीमध्ये अहिल्या एचपी गॅसचे वितरण होते. येथे रोज सकाळी नऊपासून ग्राहक सिलिंडरसाठी रांगा लावताना दिसत आहेत. अनेकांना फेब्रुवारीपासून सिलिंडर मिळाले नाही. त्यामुळे कामधंदा सोडून या रणरणत्या उन्हात त्यांना सिलिंडरसाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. एक ग्राहक दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हणाले की, ‘गेल्या दोन महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या टंचाईचा त्रास सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी मला पहिला सिलिंडर मिळाला होता. त्यानंतर आज दोन महिने होत आले. मात्र, सिलिंडर मिळाला नाही. 27 एप्रिल रोजी माझा ओटीपी आला होता. तो त्यांनी 1 तारखेला रद्द केला. काल पुन्हा दिवसभर रांगेत होतो. मात्र, गॅस मिळाला नाही. त्यानंतर मला पुन्हा ओटीपी घ्यावा लागला. आजसकाळी साडेनऊपासून रांगेत उभा आहे. दीडदोनशे ग्राहक माझ्यासोबत रांगेत आहेत.’ घरपोच सेवा मिळेना दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना गॅस ग्राहक म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगरचे तापमान रोज चाळीस अंशाच्या वर जात आहे. उन्हाची इतकी तीव्रता आहे की, त्यामुळे अनेकांना चक्कर येत आहे. येथे साधे प्यायला पाणी मिळत नाही. फार हालाकीचे दिवस सुरू आहेत. माझी केंद्र सरकारला एक नम्र विनंती आहे की, त्यांनी कमीत कमी गॅसचा पुरवठा सुरळित करावा. एकवेळ इंधन मिळाले नाही, तरी चालेल. मात्र, गॅस पुरवठा नियमित झाला पाहिजे. जेवण मिळाले पाहिजे. जीवनावश्यक वस्तू मिळणे गरजेचे आहे. घरोघरी तरी गॅस मिळतच नाही. इथे दिवसभर थांबून गॅस घ्यावा लागतो आहे.’ तब्बल 35 किमीहून आलोय दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना दुसरे ग्राहक म्हणाले की, ‘सध्या खूप मुश्किल आहे. दोन तीन महिन्यांपासून गॅस मिळत नाही. आम्ही चक्कर मारून परेशान झालो आहोत. माझी ही चौथी चक्कर आहे. गॅस बुक केल्यानंतरही अडचणी येत आहेत. पैठण तालुक्यातल्या बिडकीन डीएमआयसीमध्ये मी राहतो. तब्बल 35 किलोमीटर दूरहून मी गॅस नेण्यासाठी आलो आहे. आता आज तरी गॅस सिलिंडर मिळते का, ते पाहावे लागेल.’ कितीही रिक्वेस्ट केली तरी… दुसरे ग्राहक म्हणाले की, ‘गॅस एजन्सी ग्रामीण भागात आहे. पंचेचाळीस दिवसानंतर बुकिंग होते. बुकिंग केल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा दिवस वेटिंग करावे लागते. त्यामुळे नंबरला येऊन इथे सिलिंडर लावून येथे दिवसभर उभे रहावे लागते. सध्या संभाजीनगरचे तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंशाच्या दरम्यान रहात आहे. अशा रणरणत्या उन्हात आम्हाला येथे उभे रहावे लागत आहे. लोक चक्कर येऊन पडत आहेत. सध्या लगीन सराई सुरू आहे. कितीही रिक्वेस्ट केली तरी आम्हाला गॅस मिळत नाही.’ अजूनही निकष ग्रामीणचे अहिल्या गॅस एजन्सीचे दीपक सूर्यवंशी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हणाले की, ‘आमच्या गॅस एजन्सीला सातारा ग्रामपंचायत असताना मंजूर मिळालेली आहे. त्यानंतर 2016 मध्ये हा परिसर महापालिकेमध्ये गेला. मात्र, अजूनही गॅस एजन्सीला बुकिंगचे निकष हे ग्रामीण भागाप्रमाणे 45 दिवस लागत आहेत. परंतु 45 दिवस एक सिलिंडर पुरत नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त होतात. यासाठी अहिल्या गॅस एजन्सीकडून निकष बदलण्यासाठी डीजीएम आणि सेल्स ऑफिसरकडे अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून शासनाच्या नियमांप्रमाणे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. आता हा प्रश्न कार्यकारी संचालकांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अजून समाधान झाले नाही.’ लोक घरपोचची वाट पाहत नाहीत अहिल्या गॅस एजन्सीचे दीपक सूर्यवंशी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना पुढे म्हणाले की, ‘1 मे ची सुटी होती. त्यानंतर रविवार. यामुळे आलेल्या सुट्यामुळे आणि पुरवठा कमी असल्याने लोकांनी पॅनिक होत गर्दी केली आहे. आम्ही तिथे मंडप लावाण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी लावू दिला नाही. उद्या नागरिकांच्या सोयीसाठी मंडप टाकणार आहोत. उद्या जर अजून एक गाडी आली तर बॅकलॉक भरून निघेल. सुट्या आणि कमी पुरवठा यामुळे लोकांची गर्दी झाली आहे. काल रात्री गाडी येणार हे समजताच आम्ही लोकांना कल्पना दिली. टंचाई आहे. लोक घरपोच सिलिंडरची वाट पाहायला तयार नाहीत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed