SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा?:100 गुणांच्या पेपरमध्ये 85 प्रश्न कोचिंग क्लासच्या प्रश्नसंचातील; VIDEO समोर, विरोधकांची टीका
![]()
राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) भरती परीक्षेत एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गंभीर बाब म्हणजे परीक्षकांनी या प्रश्नांची निवड करताना त्यांचा क्रम व पर्यायही बदलले नाही. त्यामुळे या प्रकरणी एखादा घोटाळा तर झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात एक तरुण क्लासचा प्रश्नपत्रिका संच व त्यातील आलेल्या प्रश्नांवर उहापोह करताना दिसून येत आहे. सुप्रिया सुळे याविषयी बोलताना म्हणाल्या, ‘राज्य राखीव पोलीस दला’च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात. आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी, असे सुळे म्हणाल्या. तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा खेळ – वडेट्टीवार दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीतील SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले. मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे. पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच. 3977 मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचे की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टरपुरताच उरेल, असे वडेट्टीवार म्हणाले. केव्हा झाली परीक्षा? काय घडला प्रकार? एसआरपीएफ-5 या गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा गत शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयात झाली. परीक्षेत प्रत्येकी 1 गुणाचे 100 प्रश्न होते. त्याच समान 100 प्रश्नांची क्रमवारी मागे – पुढे करून ए, बी, सी, डी असे प्रश्नसंच पुरविण्यात आले. चारही प्रश्नपत्रिकेत 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या (महाराष्ट्र पब्लिकेशन) ‘पोलिस भरती 2026- 50 प्रश्नपत्रिका संच’ पुस्तकातील ‘सराव प्रश्नसंच 10’ या एकाच प्रश्नपत्रिकेतून उचलले आहेत. ‘सराव प्रश्नसंच 10’ या प्रश्नपत्रिकेतील सलग 85 प्रश्न एसआरपीएफच्या प्रश्नसंच ‘ए’मध्ये अगदी त्याच क्रमवारीनुसार आणि त्याच पर्यायांनुसार जसेच्या तसे घेण्यात आले आहेत. विद्यार्थी व पालकांमधून या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
