एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळात बदलांचे संकेत:मंत्र्यांची धाकधूक वाढली! दिवाळीपूर्वी फेरबदल, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी
![]()
राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बदलांमुळे सध्या मंत्रिपदावर असलेल्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यात प्रभावी कामगिरी दाखवली नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना पदावरून दूर करण्याची शक्यता आहे. राजकीय सूत्रांच्या मते, कामगिरीत कमी पडलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल, मात्र त्यांना पूर्णपणे बाजूला न करता पक्ष संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. यामागील उद्देश म्हणजे पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हा आहे. त्यामुळे काही नेत्यांसाठी हा बदल धक्का असला तरी काहींसाठी तो नवी संधी ठरू शकतो. या फेरबदलात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या काही नेत्यांना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. तसेच, आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक आमदारांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत. या बदलामागे आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी महत्त्वाची मानली जात आहे. पुढील दोन वर्षांत विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने सत्ताधारी पक्षाला आपली पकड अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. तळागाळातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मानले जात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी दरम्यान, काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. तसेच, वादग्रस्त ठरलेल्या किंवा स्थानिक स्तरावर नाराजी निर्माण करणाऱ्या मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या संभाव्य फेरबदलामुळे सत्ताधारी आघाडीत नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता असून, दिवाळीपूर्वी होणारा हा निर्णय राज्याच्या राजकारणात नवे वळण देणारा ठरू शकतो.
