छत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच 26 कोटी रुपयांचा लिंक लाइन प्रकल्प:तुमची वीज जाणार नाही, आता शहरातील दहा सबस्टेशनला मिळणार ‘डबल सोर्स’
![]()
शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर महावितरणने कायमस्वरूपी तोडगा शोधला आहे. शहरात लवकरच 26 कोटींचा लिंक लाइन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरक्षित होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे शहरातील सर्व 28 सबस्टेशन्सना दुहेरी वीजपुरवठ्याचा स्रोत उपलब्ध होईल. शहरात 33 केव्हीची 28 सबस्टेशन्स आहेत. सद्य:स्थितीत यातील 18 ठिकाणी दोन स्रोतांकडून वीज मिळते, मात्र 10 सबस्टेशन्स केवळ एकाच वाहिनीवर अवलंबून आहेत. परिणामी, या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास संबंधित भागातील 20 ते 30 हजार ग्राहकांना तासन्तास अंधारात राहावे लागते. लिंक लाइन प्रकल्पामुळे ही सर्व केंद्रे रिंग मेन सिस्टिमद्वारे एकमेकांना जोडली जातील. या भागांना होणार मोठा फायदा प्रामुख्याने जाधववाडी, वाल्मी, समाधान कॉलनी, वाळूज (एम आणि ई सेक्टर), सिडको एन-7, एन-10 आणि बेडसे या भागांतील सबस्टेशन्स आता डबल सोर्सने जोडली जाणार आहेत. 2 महिन्यांत काम पूर्ण होणार “लिंक लाइन प्रकल्पाचा डीपीआर मंजुरीसाठी मुख्यालयाकडे पाठवला आहे. निधी प्राप्त होताच पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल,” असे महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे तांत्रिक बिघाड शोधणे सोपे होणार असून लोड शिफ्टिंगची सुविधाही उपलब्ध होईल. असा लिंक लाइन प्रकल्प? सध्या एखाद्या फीडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी पूर्ण पुरवठा बंद करावा लागतो. मात्र,”रिंग मेन सिस्टिम’मुळे सर्व 28 फीडर्स साखळीने जोडले जातील. यामुळे एका वाहिनीवर ताण आल्यास लोड दुसऱ्या वाहिनीवर शिफ्ट करता येईल आणि तांत्रिक बिघाड शोधणे सोपे होईल.
