राजभवनात बालवारकऱ्यांचा भक्ती सोहळा:पंढरीचे चैतन्य अवतरले, निल्लोड फाटा येथील वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वारकऱ्यांचे सादरीकरण‎

0
app_177789709369f88e8528ca9_image_picker_edde7809-abdb-491a-9e48-5a5.jpg




महाराष्ट्र आणि गुजरातच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात अपूर्व भक्ती सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन अमरवाणी फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या बाल वारकऱ्यांनी सादरीकरण केले. राजभवनात प्रत्यक्ष पंढरीचे चैतन्य अवतरले. चिमुकल्या वारकऱ्यांनी पावली, फुगडीच्या तालावर वारकरी खेळ सादर केले. संतांच्या जीवनप्रवासातील ऐतिहासिक, अद्भुत प्रसंग जिवंत केले. ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत दाखवली. संत जनाबाईंसोबत विठ्ठलाने दळलेले दळण दाखवले. संत नामदेवरायांच्या हाताने देवाने खाल्लेली खीर दाखवली. जगद्गुरू तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्तनातील ऐतिहासिक भेट सादर केली. संत गोरोबा काकांनी भक्तीच्या नशेत चिखलासोबत बाळ तुडवल्याचा प्रसंग पाहून उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख उपस्थित होते. त्यांनी बाल वारकऱ्यांच्या कलेचे, संस्कारांचे कौतुक केले. न्यायमूर्ती मदन गोसावी उपस्थित होते. पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. ‘अनाथांची माउली’ रामेश्वरजी महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निल्लोडच्या मातीतील बाल वारकऱ्यांनी मुंबईच्या राजभवनापर्यंत घेतलेली झेप वारकरी संस्कृतीचा गौरव ठरली. आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कार्यक्रमातून वारकरी भक्तीचा दरवळ जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचा प्रत्यय आला. यांची होती प्रमुख उपस्थिती, मान्यवरांनी केले मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ठगनराव भागवत यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वारकरी अध्यापक संदीप महाराज काकडे, पुरुषोत्तम महाराज पवार, व्यवस्थापक गजानन महाराज दिगावकर, संस्था सदस्या शारदा पवार, अकील शेख, शंकर लोखंडे, भारूडकार शरद काकडे, रमेश सुरडकर, सुशांत वाघ, मुख्याध्यापक कृष्णा जैवाळ, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, प्राचार्य नामदेव चापे, कृष्णा लहाने, कोषाध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed