काटेपूर्णा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लखलख चांदण्यात रंगली मचान गणना:मे महिन्यातील कडक उन्हामुळे पाणवठे कोरडे
![]()
प्रतिनिधी | मंगरूळपीर
वैशाखातील बैद्धपौर्णिमेच्या लख्ख, दूधासारख्या चांदण्यात न्हालेल्या जंगलात शांततेचा एक वेगळाच स्वर उमटला होता आणि त्या शांततेतून सुरू होती वन्यजीवांच्या हालचालींची नोंद. वाशीम आणि अकोला जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये यंदाची मचान प्राणी गणना उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. मे महिन्याच्या कडक उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी बाहेर पडतात. याच पार्श्वभूमीवर वन विभागाने निसर्गप्रेमींना वन्यजीवांच्या जवळून अभ्यासाचा आणि अनुभवाचा एक दुर्मिळ क्षण उपलब्ध करून दिला. कोअर आणि बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारण्यात आले होते. जिथून सहभागी रात्रभर निसर्गाचे साक्षीदार बनले. चांदण्यांच्या प्रकाशात जंगलाचा प्रत्येक कोपरा जिवंत भासत होता. पानांची सळसळ, दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, आणि अधूनमधून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांची चाहूल या साऱ्यांनी वातावरणात एक रोमांचक थरार निर्माण केला होता. सायाळ, हरीण, चितळ, बिबट, रानडुक्कर, कोल्हे आणि लांडगे यांसारख्या प्राण्यांचे दर्शन अनेकांना झाले. तर विविध पक्ष्यांच्या हालचालींचीही नोंद घेण्यात आली. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सहभागीना निसर्ग निरीक्षणाचे मूलभूत नियम, वन्यजीवांचे वर्तन आणि संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “निसर्गात शांतपणे बसून निरीक्षण केल्याने संयम, संवेदनशीलता आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव वाढते,” अशी प्रतिक्रिया मैत्रेय डोंगरे, विलास देशमुख, डॉ. प्रियंका भोजने, डॉ. शरद खूरसुडे आणि अनुराग महाले या निसर्गप्रेमींनी व्यक्त केली. वन परीक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी सांगितले की,”मचान गणनेमुळे वन्यप्राण्यांची संख्या, त्यांच्या हालचाली आणि सवयींचा अभ्यास करण्यास मदत होते. ही माहिती वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या उपक्रमात वनपाल एन. डी. तुपकर, वनरक्षक प्रवीण कांबळे, अमोल पोटे, पौर्णिमा यादव यांच्यासह मुख्य पर्यटक मार्गदर्शक दत्ता शेलकर, नागेश आकोडे, सुमित भगत, अक्षय डाखोरे आणि प्रथम चिंकटवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. चंद्रप्रकाशात पार पडलेली. ही मचान गणना केवळ वन्यजीव मोजणीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडण्याची संधी ठरली. शहरांच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेली ही रात्र अनेकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरली. काटेपूर्णाच्या या उपक्रमातून केवळ आकडेवारीच नाही, तर पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निसर्गप्रेमाची नवी प्रेरणा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मचानावर वन विभागाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक बफर क्षेत्रातील निसर्ग माहिती केंद्रासह गेरुचा घाट, बीबट्याची खिंड, पांडव लेणी, कलंबाची खिंड, चाका पॉईंट, घारीचा आसोडा, गारपीट पॉईंट, तीन खोड्या पळस आणि चौफुला अशा विविध ठिकाणी मचान उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व मचान आधीच पूर्णपणे बुक झाले होते आणि लॉटरी पद्धतीने सहभागींची निवड करण्यात आली होती. प्रत्येक मचानावर वन विभागाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक आणि सुरक्षा रक्षक तैनात होते. ज्यामुळे हा उपक्रम सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले .
