सारोळ्यात लोकसहभागाने शेतरस्ता; शेतात जाण्यासाठीची गैरसोय थांबणार:तीन लाखांचा निधी जमा करून केले रस्त्याचे काम, उपक्रमाचे कौतुक
![]()
प्रतिनिधी | सारोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारात शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात खड्डे आणि असमतल रस्ता यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा संबंधित प्रशासनाकडे मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. मात्र, अडचणींसमोर हार न मानता सारोळा गावातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत स्वतःच पुढाकार घेतला. “आपलं काम आपणच” या भूमिकेतून शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे तीन लाख रुपयांचा निधी जमा केला. या निधीतून स्क्रॅपर व इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून रस्ता समतल केला, खड्डे बुजवले आणि मुरूम टाकून रस्ता मजबूत केला. परिणामी, आता शेतात जाणे अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे. शेतीकामे वेळेत आणि सुरळीत पार पडू लागली असून याचा थेट सकारात्मक परिणाम उत्पादनावर होणार आहे. शेतकऱ्यांची एकजूट ठरली मार्गदर्शक सारोळा शिवारातील पांदण रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे ३ लाख रुपये स्वखर्चाने जमा केले आणि स्क्रॅपरच्या सहाय्याने रस्ता दुरुस्त केला.
