बुलढाण्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग:5 वर्षांची मेहनत क्षणात भस्मसात, सिंदखेड लपाली शिवारातील हजारो झाडे जळून खाक

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-03t184633747_1777814230.jpg




बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली शिवारात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मियावाकी प्रकल्पाला भीषण आग लागल्याने हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आकारास आलेल्या या हरित उपक्रमाचे आगीमुळे मोठे नुकसान झाले असून, डोळ्यांदेखत हा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी उभा राहिलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प काही क्षणांत नष्ट झाल्याने ग्रामस्थांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावामध्ये गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून एक आदर्श ‘मियावाकी’ प्रकल्प उभा राहिला होता. सरपंच प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 20 ते 25 एकर क्षेत्रावर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या प्रकल्पामुळे केवळ निसर्गाचे रक्षण झाले नव्हते, तर पाणी अडवून जमिनीत मुरविल्यामुळे परिसरातील भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली होती. ग्रामस्थांनी आपल्या मुलांप्रमाणे जपलेला हा हरित उपक्रम औषधी आणि उपयुक्त वनस्पतींमुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणास्थान ठरत होता. मात्र, आज दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत या फुललेल्या वनराईचे अतोनात नुकसान झाले. काही क्षणांतच हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि ठिबक सिंचनाचे महागडे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले असले, तरी या दुर्घटनेत पाच वर्षांची मेहनत डोळ्यांदेखत जळून खाक झाली आहे. ही आग कोणीतरी जाणीवपूर्वक लावली की हा केवळ अपघात होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या अनपेक्षित घटनेमुळे सिंदखेड लपाली परिसरात मोठी हळहळ आणि निराशेची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *