मावळमध्ये पर्यटनाचा भीषण अंत:पवना नदीत पुण्याच्या 3 मित्रांचा बुडून मृत्यू; पोहण्याचा मोह जीवावर बेतला

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-03t181328549_1777812244.jpg




उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा आनंद लुटण्यासाठी मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. नदीत पोहण्याचा मोह या तरुणांच्या जीवावर बेतला असून, या भीषण दुर्घटनेमुळे मावळ परिसरासह मृतांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख हे तीन मित्र रविवारी सुट्टीनिमित्त मावळमधील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. मात्र वाढत्या उन्हाच्या तडाख्यापासून थंडावा मिळवण्यासाठी थूगाव येथील पवना नदीत पोहण्याचा मोह त्यांना महागात पडला. पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने हे तिघेही एकामागून एक पाण्यात बुडू लागले आणि परिसरात असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येईपर्यंत त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘शिवदुर्ग मित्र’ मंडळाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून, पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून आवाहन मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असली तरी, नद्या, धरणे किंवा धबधब्यांच्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न घेता उतरणे जीवावर बेतू शकते. वाढत्या उष्णतेमुळे थंडाव्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने पाण्याकडे आकर्षित होतात, परंतु अनेकदा सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने गंभीर अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर, “नदी किंवा धरण पात्रात पोहताना पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कोणत्याही अपरिचित ठिकाणी पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed