भारतीय परंपरा, संस्कृतीवर परदेशी पाहुणे फिदा:बेलापूरच्या देसाई परिवारातील विवाहासाठी इंग्लंडचे ५ नागरिक श्रीरामपुरात
![]()
प्रतिनिधी |श्रीरामपूर भारतीय संस्कृतीतील विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून तो एक उत्सवाचा सोहळा असतो, याची प्रचिती बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे आली. पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या सागर याच्या विवाहानिमित्त थेट इंग्लंडहून ऑर्थर, जोंनथन, अलेक्स, लिडीया आणि अमेलिया हे पाच पाहुणे खास उपस्थित राहिले. भारतीय विवाह सोहळ्यातील कौटुंबिक जिव्हाळा आणि रितीरिवाज पाहून हे परदेशी पाहुणे भारावून गेले. इंग्लंड निवासी पाहुण्यांचे बेलापुरात आगमन होताच फटाक्यांच्या कडकडाटात आणि गुलालाच्या उधळणीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाहुण्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. देसाई परिवाराच्या घरी पोहोचताच पारंपरिक पद्धतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. आम्हाला आमचे मित्र चैतन्य देसाई यांच्याकडून लग्नाचे निमंत्रण मिळाले होते. भारतीय संस्कृतीत प्रेम, आपुलकी आणि आदराचा जो संगम पाहायला मिळतो, तो जगात कुठेही नाही. इथला विवाह सोहळा जवळून पाहण्याचा योग आला, हे आमचे भाग्य आहे,” अशी भावना ऑर्थर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. देसाई परिवार, सत्यमेव जयते ग्रुप आणि बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने या पाहुण्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णुपंत डावरे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, अजीज शेख, जाकीर शेख,अल्ताफ शेख ,प्रविण बाठीया, मयुर खरात, रफीक शेख, चाँद शेख, मोहसीन सय्यद, शफीक बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे हा विवाह सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
