जनगणना भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवेल – पालकमंत्री गोरे:महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय मैदानावर पोलिस परेड‎

0
app_177771875869f5d5e6e9c8d_1003478188.jpg




प्रतिनिधी | सोलापूर जनगणना २०२७ ही देशाची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असून, ती भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवेल. आजपासून ते १५ मे २०२६ या काळात स्व-जनगणना मोहीम राबवली जात असून, सर्व नागरिकांनी यात सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत जिल्ह्यातील ४.८६ लाख शेतकऱ्यांना ९७.३९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेत २०२५-२६ मधील ७८३ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला असून, २०२६-२७ साठी ८४२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय, सोलापुरातून मुंबई आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली असून लवकरच तिरुपती, हैदराबाद आणि पुण्यासाठीही ती सुरू होईल. विमानतळावर नाईट लँडिंग, तरुणांना रोजगारासाठी नवीन आयटी पार्क आणि शहरवासीयांसाठी १३७८ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना यासारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉर, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराजांचे स्मारक आणि अरण येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मारकाचे (१५० कोटींचा आराखडा मंजूर) काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेत्या पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणेच क्रीडा, महिला बाल विकास व अन्य विभागातील पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. बसवेश्वर स्मारकासाठी १५० कोटी निधीचा आराखडा मंजूर, १०० कोटी निधी उपलब्ध आराखडा बनवण्याचे काम जगदगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांचे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने स्त:ताच्या मालकीची १५ एकर जागा उपलब्ध करुन दिली असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांचे अरण येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने १५० कोटी निधीचा आराखडा मंजूर केला असून त्यापैकी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed