शेतमजुरी; स्वत:च स्वयंपाक करत किशोरचे बारावीत यश:आजारी आईची सेवा; न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यशोगाथा‎

0
240_177773144069f6077065b34_02hscresultk.jpg




प्रतिनिधी | अकोला घरची आर्थिक परिस्थिती बेताची…केवळ दीड एकर शेती…वडिलही इतरत्र काम करतात,भाऊ खासगी क्षेत्रात नौकरीला…महाविद्या लयाला सुट्टी असलेल्या दिवशी स्वत:ही शेत मजुरी केली, आजारी आईची सेवा केली, एक वेळचा स्वयंपाक स्वत:च केला, अशा विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत वर्षभर नियमित अभ्यास केला अन् बारावीत वाणिज्य शाखेतून प्रथम येत अथक परिश्रमाने शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा पार केला. किशोर दिनकर गाडे असे या संघर्षयात्रीचे नाव आहे. तो अनवाडी येथे राहतो. तो घरापासून दोन कि.मी. असलेल्या बंधू गोटा फाट्यापर्यंत पायी घेऊन तेथून अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात येत होता. बँकिंग क्षेत्रात भविष्य घडवण्याचा संकल्प संकल्प त्याने यानिमित्ताने बोलून दाखवला. न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा किशोर गाडे हा वडिलांसह भाऊ सूरज सोबत अनकवाडी येथे राहतो. मोठा भाऊ सूरजही पदवीधर आहे. तो खासगी नौकरी करतो. घरी केवळ दीड एकर शेती आहे. तीही अनेकदा लागवणने देण्यात येते. आर्थिक परिस्थितीपुढे हात न टेकता दोन्ही भाऊ शिकत आहेत. वडिलही मुलांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असून, घरच्या परिस्थितीशी आम्हा दोन्ही भावांना जाणीव असल्याचे किशोरच्या बोलण्यातून जाणवले. भाऊ मला शिकण्यासाठी नेहमीच प्रेरीत करतो, असेही किशोरने आवर्जून नमूद केले. वडील कंत्राटीपद्धतीने शिक्के मारण्याचे काम करतात. घरातील तिघेही जण उदनिर्वाहसाठी कष्ट उपसतात. बारावीत सकाळी काही वेळ अभ्यास व नंतर महाविद्यालय. महाविद्यालयातून घरी परतल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करून नंतर अभ्यास, असा त्याचा दिनक्रम होता. अखेर बारावीच्या परीक्षेचा निकालाचा दिवस उजाडला आणि त्याला वाणिज्य शाखेतून ६०० पैकी ४७१ गुण मिळाले. वडील, भावाची साथ व शिक्षक अमोल काजळे, प्रा.नंदकिशोर थुटे, प्राचार्य माधव मुनशी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे त्याने सांगितले. त्याचा महाविद्यालयाकडून सन्मानही करण्यात आला. वेळी शिक्षकांसह प्रा. अमोल बुटे, श्रीकांत रत्नपारखी, राहुल महाजन, उदय कोल्हेकर आदी होते. आईचे छत्र हरवले; न खचता घेतले परिश्रम किशोरची आई आजारी होती. त्याने आईची मनोभावे सेवा केली. मात्र नियतीने ठाव साधला आणि आईचे छत्र हरवले. तो डगमगला नाही. अभ्यास सुरुच ठेवला. शनिवार व रविवारी इतरांच्या शेतात २५० रुपये रोजाने निंदन, पीक वेचणीसाठी गेला. कुटुंबाला हात भार लावला. बारावीत कोणतीही खासगी शिकवणी त्याला नव्हती. तासिका झाल्यानंतर त्याने न्यू. इंग्लिश हायस्कूलच्या सुसज्ज अशा वाचनालयातच अभ्यास केला व परिस्थितीपुढे न झुकता त्याने बारावीच्या परिक्षेत यशाला गवसणी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed