नांदेडमध्ये घरफोडी व चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास


नांदेड (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांसह दोन आरोपींनी मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

विष्णू नगरमध्ये घरफोडी; 3.17 लाखांचा मुद्देमाल चोरी

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णूनगर येथे 15 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 20 जून रोजी पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने एका घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चंद्रकांत दिगांबर दमकोंडवार (वय 52, रा. विष्णूनगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(अ), 331(1)(2)(3)(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक सय्यद करीत आहेत.

राहेगावमध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या चोरी

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेगाव येथे 15 जून 2026 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान चोरीची घटना घडली. साईनाथ मोतीराम भोंग (वय 30) व आदिनाथ मोतीराम भोंग (वय 25, दोघेही रा. राहेगाव) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरातील आलमारीत ठेवलेल्या 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अंताजी चंपती इंगळे (वय 30, रा. राहेगाव) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 302(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मांजरसकर करीत आहेत.


Post Views: 331






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *