![]()
महिला बचत गटाचे संकलित पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मिरचीपूड फेकून रोख रक्कम व टॅब लुटणाऱ्या तिघा संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोख रक्कम, टॅबलेट, मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . याबाबत माहिती अशी की, एयू फायनान्स कंपनीचा कर्मचारी नवनाथ मोरे हे गावातील महिला बचत गटांकडून पैसे संकलित करून जात असताना त्यांची हालचाल संशयितांना कळविण्यात आली. त्यानंतर पारधीपाडा-लाडची रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी संशयितांनी त्यांना अडवून मिरचीची पूड फेकली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील बॅगमधील ७० हजार रुपये रोख रक्कम व हिशोबाचा टॅब घेऊन संशयित विळवंडीच्या दिशेने पसार झाले. हरसूल पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे योगेश लहान फसाळे (रा. लाडची), जयराम महादू पारधी व सोपान हरी पारधी (दोघे रा. पारधीपाडा) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, ८४ हजार ८८० रुपये रोख रक्कम, टॅबलेट, तीन मोबाईल असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिरचीपूड फेकून लुटणारी टोळी जेरबंद:लाडची येथील रस्तालुटीचा 15 दिवसांत उलगडा; हरसूल पोलिसांची कामगिरी
