मध्यरात्रीचा रक्तरंजित थरार; धार्मिक सेवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पाच आरोपी चार दिवस पोलीस कोठडीत


मिळालेल्या माहितीनुसार, 21 जूनच्या मध्यरात्रीनंतर ही धक्कादायक घटना घडली. शेख शमीम यांच्यावर गोळीबार करण्यात आला तसेच तलवारी व धारदार शस्त्रांनी अनेक वार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात भीती, संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी शेख वसीम शेख इसाक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद  पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील खूनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

तक्रारीमध्ये तीन नामनिर्देशित आरोपींसह दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान मुस्ताक अहमद इसाक अहमद, सय्यद सुफियान सय्यद जमील, माधव भगवान कांबळे आणि ऋषिकेश अनिल घुगे यांनी हल्ल्यात सक्रिय सहभाग घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. एका आरोपीने खंजीराने वार केले, तर अन्य आरोपींनी तलवारीने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका आरोपीने दोन गोळ्या झाडल्याचा आरोपही तपासात पुढे आला आहे.

न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. के. एम. बहादूर यांनी युक्तिवाद करताना पोलीस कोठडीची मागणी केली. तपास अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे, अग्निशस्त्रे, तलवारी व अन्य पुरावे जप्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याशिवाय या कटामागील नेमका हेतू काय होता, आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच फरार संशयित मिर्झा शब्बर बेग गफार बेग आणि मिर्झा कलंदर बेग यांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले.

आरोपींच्या वतीने ॲड. आर. जी. परळकर यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी गीतांजली भागवत यांनी सर्व पाच आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक वैभव पडवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे तसेच पोलीस अंमलदार भाऊसाहेब राठोड,हबीब चाऊस,दिगंबर मुसळे,संतोष पावडे,संतोष पोकळे आणि गृह रक्षक दलाचे जवान खालिद आदींनी जवानांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. या हत्येचा तपास वेगाने सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ ..

संबंधित बातमी ….

खडकपुरा खून प्रकरणातील पाच आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *