कामगार दिनी विद्युत भवनामध्ये लाईनमनच्या पुतळ्याचे अनावरण:‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित
![]()
प्रतिनिधी| अकोला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विद्युत भवन येथे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अधीक्षक अभियंता दीपक सोनोने, सहाय्यक महाव्यवस्थापक मनिष भोपळे, कार्यकारी अभियंते अजितपालसिंह दिनोरे, धीरज चव्हाण, शशांक पोंक्षे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण शेलकर यांनी केले. सूत्रसंचालन यंत्रचालक संजय पुरकर यांनी केले, तर आभार सुरेंद्र क्षीरसागर यांनी मानले. दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहनांचे वितरण : आपल्या नैसर्गिक दिव्यांगावर मात करत विजेसारख्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या परिमंडळातील २१ दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दुचाकी वाहन मंजूर झाले. दुचाकी वाहनामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात ये – जा करण्यास सोयीचे होणार आहे. मुख्य अभियंता यांच्या हस्ते आज ६ दुचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६, बुलडाणा जिल्ह्यातील ११ आणि वाशीम जिल्ह्यातील ३ दिव्यांग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लाईनमन हा खऱ्या अर्थाने प्रकाशदूत असल्याचे मुख्य अभियंता राजेश नाईक म्हणाले. रात्रंदिवस, वादळ-वारा, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तो अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतो. त्यामुळेच ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा देणे शक्य होते. लाईनमन ही महावितरणची केवळ ओळखच नसून तो महावितरणचा कणा आहे. त्यामुळे लाईनमनचा पुतळा उभारण्याचे भाग्य लाभल्याचा मला विशेष आनंद आह. “वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. वीज क्षेत्रात केवळ इतिहासावर जगता येत नाही. ग्राहकांचे समाधान हेच आपले ध्येय असले पाहिजे. अडचणी कितीही असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजे. आपल्या कामातून वीज ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हीच खरी सेवा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
