‘जय गुरुदेव’चा जयघोष; दिव्यांनी उजळून निघाले यावली शहीद गाव:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव सोहळा, मान्यवरांची हाेती उपस्थिती
![]()
प्रतिनिधी | अमरावती नजिकच्या यावली शहीद येथे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यांची जन्मभूमी या गावात भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जय गुरुदेव चा निनाद आणि दिव्यांची आरास करण्यात आली. पहाटे ४ वाजता पासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा कार्यक्रम गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व संच यांच्या सादरीकरणाने साजरा झाला. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. देवेंद्र यादव तर संचालक श्रीकृष्ण पखाले होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेंद्र वानखडे, माजी मंत्री एड यशोमती ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित होते. सकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम ग्रामनाथांचा सत्कार करण्यात आला.इतर कार्यक्रमाच्या श्रृंखलेत सकाळी ६.३० वा. ग्राम प्रदक्षिणा व स्पर्धात्मक पालखी दिंडी सोहळा, सकाळी १०.३० ला लक्ष्मणदास काळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वाजता ऐतिहासिक सत्यावर आधारित दोन अंकी नाटक ‘ज्योतिबाची सावली, सावित्री माऊली’ सादर करण्यात आले. अशाप्रकारे ग्राम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने यावली शहीद मध्ये दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव समिती व सर्व गावकऱ्यांच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला. गावात रस्ता सडा टाकून रांगोळ्यांनी सजवला पहाटे तीन वाजतापासूनच गावात अतिशय प्रसन्न वातावरणात विविध भागातून येणाऱ्या गुरुभक्तांचे ग्रामस्थांकडून स्वागत झाले. दुसरीकडे गावातील प्रत्येक रस्ता सडा टाकून रांगोळ्यांनी सजविण्यात येऊन घरोघरी दारात व अंगणात दिवाळीप्रमाणे दिव्यांची आरास करण्यात आली. वैशाखाच्या रात्री संपूर्ण गाव लख्ख प्रकाशाने न्हाऊन निघाले.
