पदभार स्वीकारण्यापूर्वी नूतन पोलीस अधीक्षक साईचरणी झाले नतमस्तक:नागरिकांच्या सतर्कतेतूनच जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणे शक्य

0
730-x-548-new-2026-05-03t094235928_1777781596.jpg




प्रतिनिधी | शिर्डी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नव्याने नियुक्त झालेले सुदर्शन मुम्मुक्का यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शिर्डीत जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. “जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर कडक लगाम घालणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नूतन पोलीस अधीक्षक मुम्मुक्का म्हणाले, जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कडक धोरण अवलंबले जाईल. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सतर्कतेतूनच जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. घार्गे यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. अशा परिस्थितीत मुम्मुक्का यांच्यासमोर तपासाचा मोठा डोंगर उभा आहे. विशेषतः राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासाला गती देणे आणि वेळेत आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. या प्रकरणातील पुराव्यांची साखळी मजबूत करून निष्पक्ष कारवाई करण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिर्डीत आगमन झाल्यानंतर श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींनी नूतन अधीक्षकांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *