गौताळ्यात बिबटे, नीलगायींचा वावर‎:वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपक्रम, मचाणावर विद्यार्थी थांबले मुक्कामी‎

0
240_177773392669f611262b92e_47581677526.jpg




प्रतिनिधी | कन्नड बुध्द पोर्णिमेनिमित्त गौताळा अभयारण्यात शुक्रवारी वन्यप्राणी गणना केली. यावेळी बिबटे, उद मांजरासह नीलगायी, कोल्हा, मोरांचा वावर आढळून आला. मचाणावर नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आली. प्रथम वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमी गौताळा अभयारण्यातील चंदननाला चौकीवर जमा झाले. या ठिकाणी विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनरक्षक विशाल लोंढे, वनपरिक्षेत्राधिकारी सचिन रामपुरे, वनपाल समाधान पाटील यांनी वन्य प्राणी गणना करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती देऊन फॉर्म भरून घेतले. त्यानंतर नेमून दिलेल्या पाणवठ्यावर सर्व वन्य प्राणी प्रगणक रवाना झाले. पाटणा येथील वनपरिक्षेत्राधिकारी एम. के. रहाटवळ, वनपाल तानाजी गाडेचव्हाण, वनरक्षक अशोक मोरे यांनी नियोजन केले. सूर्य मावळण्याच्या आधीच वन्य प्राणी गणनेसाठी सर्वांनी मचाणावर स्थान ग्रहण केले. सूर्य मावळल्यानंतर जंगलात स्तब्ध शांतता पसरली. त्यानंतर गडद अंधाराचे साम्राज्य संपूर्ण जंगलभर पसरले. सात वाजेच्या सुमारास चंद्र उगवला आणि हळूहळू संपूर्ण जंगलावर चंद्र प्रकाशाने जंगल उजळून गेले आणि वन्य प्राण्यांचे जनजीवन सुरू झाले. वनपाल समाधान पाटील यांनी सांगितले की, वन्यप्राणी गणनेसाठी ९५ वन अधिकारी, कर्मचारी, ४९ निसर्गप्रेमी सहभागी झाले. सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत मचाणावर पाण्यासाठी येणाऱ्या वन्य प्राण्यांची चंद्रप्रकाशात गणना केली. रात्री पावणेआठच्या सुमारास कंपार्टमेंट नंबर ३०६ मधून हळूवार पावलं टाकत जंगलातून बिबट्या आला होता. गौताळा अभायरण्यात वावरताना नीलगाय. वन्य प्राणी प्रगणकांच्या नोंदींचे संकलन करण्यात आले आहे. त्यात बिबट २, ससे ७, रानडुकरे ९८, उद मांजर १, नीलगाय १६, कोल्हा १, मोर ३३, हरीण १, वानर ३३, सायाळ १ असे १९३ वन्यप्राणी पाणवठ्यावर दिसले. गणना करण्यासाठी डॉ. किशोर पाठक, अनिल शिरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, सचिन शिंदे, एम. के. रहाटवळ, वनपाल भगवान कोळी, रायसिंग, कदीर पठाण, हनोक घोरपडे, वनरक्षक हिरेकर, अश्विनी वाघ आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed