पुणे बाल पुस्तक जत्रा महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल:वाचन संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम गरजेचे – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

0
b674967b-72fb-4541-9ad0-b71052c9f264_1777718775683.jpg




पुणे बाल पुस्तक जत्रेसारखे उपक्रम मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातून वाचन संस्कार जपण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेला रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध भाषेतील बालसाहित्य असलेल्या दालनांना भेटी दिल्या. तसेच, लगोरी, टायर रेस, सागरगोटे, विटी-दांडू, भोवरा आणि दोरीवरच्या उड्या यांसारखे पारंपरिक खेळ खेळणाऱ्या लहान मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. या प्रसंगी ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’ या कार्यक्रमातील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते अजय पूरकर, गायक अवधूत गांधी, कार्यक्रमाचे संयोजक कुशल खोत आणि लेखक-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अभिनेते प्रवीण तरडे आणि समन्वयक सुनील महाजन आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, वाचनप्रेमी पुणेकर अशा उपक्रमांतून वाचन संस्कृती जोपासत आहेत. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि साहित्यातील ज्ञान व्यवहारात आणण्यासाठी असे उपक्रम फायदेशीर ठरतात. धावपळीच्या युगात नव्या पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळा, समाज आणि सरकारने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुणे बाल पुस्तक जत्रा हा एक आगळावेगळा उपक्रम असून, तो संपूर्ण महाराष्ट्रात राबवला पाहिजे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed