संपत्तीच्या वादातून बोरामणीत तिहेरी हत्याकांड:दिराचे विधवा वहिनीसह दोन मुलांवर तलवारीने वार, मायलेकांचा जागीच मृत्यू

0
db-temp-cover-marathi-2026-05-02t173300718_1777723416.jpg




सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामणी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या भावाच्या कुटुंबाचा पत्ता कायमचा कट केला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण हल्ल्यात आई आणि तिच्या दोन तरुण मुलांचा जागीच मृत्यू झाला. गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत गायत्री मस्के यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर त्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत होत्या. गायत्री यांचा दिर ‘पप्पू’ हा त्यांच्या शेजारीच राहत होता. दोन्ही कुटुंबांच्या घरांना गच्चीवर जाण्यासाठी एकच सामायिक मार्ग आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गायत्री आपल्या दोन्ही मुलांसह गच्चीवर गाढ झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या शांततेत आरोपी पप्पू हातात तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला. तिथे जुन्या संपत्तीच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात पप्पूने वहिनी गायत्री यांच्यावर तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. आईला वाचवताना मुलांचाही मृत्यू आपल्या आईवर होणारा प्राणघातक हल्ला पाहून प्रिया आणि शिवराज या दोन्ही मुलांनी तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. मात्र, रक्ताने माखलेल्या आरोपीने दयामाया न दाखवता दोन्ही मुलांवरही तलवारीने सपासप वार केले. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी तात्काळ बोरामणी परिसरात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी संबंधित घर सील केले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. हलाखीचा संसार अन् क्रूर अंत पतीच्या निधनानंतर गायत्री मस्के यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन केले होते. मात्र, ज्या दिराचा त्यांना आधार वाटायला हवा होता, त्याच दिराने संपत्तीसाठी त्यांच्या आयुष्याचा असा करुण अंत केल्यामुळे बोरामणी गावात संतापाची लाट उसळली आहे. हे ही वाचा… 65 वर्षीय नराधमाचा 4 वर्षीय मुलीवर अत्याचार:दगडाने ठेचून केली हत्या; पुण्याच्या भोर येथील भयंकर घटना, महिलांचा निषेध मोर्चा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलिस ठाण्याबाहेर ठेवून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed