नागपूर विभागाचा बारावीचा निकाल 88.67 टक्के:राज्यात आठवे स्थान कायम, मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी
![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. नागपूर विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे. या विभागाचा निकाल मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित कमी झाला आहे. २०२५ मध्ये ९०.५२ टक्के, २०२२-२३ मध्ये ९०.३५ टक्के, तर २०२३-२४ मध्ये ९२.१२ टक्के निकाल लागला होता. यावर्षी नागपूर विभागातून एकूण १ लाख ५३ हजार २५६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५२ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७६ हजार ७५३ मुले आणि ७५ हजार ४७७ मुलींचा समावेश होता. यापैकी ६५ हजार १६७ मुले आणि ६९ हजार ८२१ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.९० टक्के, तर मुलींची ९२.५० टक्के इतकी नोंदवली गेली आहे, ज्यामुळे मुलींनी मुलांपेक्षा लक्षणीयरीत्या चांगली कामगिरी केली आहे. नागपूर विभागाच्या निकालात यावर्षी नागपूर जिल्ह्याने ९१.६६ टक्केवारीसह प्रथम स्थान पटकावले आहे. नेहमी आघाडीवर असणारा गोंदिया जिल्हा ८९.५९ टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर चंद्रपूर जिल्ह्याने ८८.७२ टक्केवारीसह तिसरे स्थान मिळवले. वर्धा जिल्ह्याची टक्केवारी ८७.५२ इतकी असून त्यात घसरण दिसून आली. जिल्हानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी अशी आहे: नागपूर ९१.६६%, गोंदिया ८९.५९%, चंद्रपूर ८८.७२%, वर्धा ८७.५२%, भंडारा ८४.१२% आणि गडचिरोली ७९.६३%. प्रत्येक जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे: नागपूर ५७,३४०, चंद्रपूर २३,७३९, गोंदिया १६,१८४, भंडारा १३,९२७, वर्धा १३,५८५ आणि गडचिरोली ९,९३१. एकूण १,३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
