अंजली भागवत, सुंदर अय्यर यांना सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार:पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून पुरस्कार प्रदान
![]()
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर यांना जाहीर झाला आहे. पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. दरवर्षी एक खेळाडू आणि एक क्रीडा संघटक यांना हे पुरस्कार दिले जातील. कै. सुरेश कलमाडी यांच्या १ मे या जन्मदिनी दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी दिली. यंदाच्या पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. पुण्यात मॅरेथॉन भवन येथे १ मे रोजी कै. सुरेश कलमाडी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित खेळाडू आणि क्रीडा संघटकांच्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रथम कै. सुरेश कलमाडी यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना ॲड. अभय छाजेड यांनी सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. सुरेश कलमाडी हे १९९६ ते २०१२ पर्यंत भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष होते. तसेच, २००० ते २०१३ पर्यंत एशियन ॲथलेटिक्स असोसिएशनचे आणि १९८७ ते २००५ पर्यंत ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याव्यतिरिक्त, पुणे, बेंगळूरु, मणिपूर, पंजाब, हैदराबाद, गुवाहाटी आणि झारखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तसेच २००३ मध्ये आफ्रिकन-आशियाई खेळांचेही त्यांनी यशस्वी आयोजन केले. देशात पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुण्यात सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री. शिवछत्रपती क्रीडानगरी उभारण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी देशात ॲथलेटिक्स क्रीडा संस्कृती रुजवली आणि हजारो तरुण खेळाडू घडवण्यात मोलाचे योगदान दिले. पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेणाऱ्या कै. सुरेश कलमाडी यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
