युवक काँग्रेसतर्फे लोकशाही संवादमध्ये पाच अभियानांचे उद्घाटन:सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याची गरज, ज्येष्ठ विचारवंतांचे मत
![]()
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘लोकशाही संवाद’ कार्यक्रमांतर्गत पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन केले. यावेळी विचारवंतांनी हुकूमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीची पुनर्स्थापना, संविधानाचे पावित्र्य राखणे आणि तळागाळातील जनतेशी नव्याने नाते जोडण्याचा संकल्प युवक काँग्रेसने करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही पाच वैचारिक अभियाने डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश आणि रोहित वेमुला यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहेत. या अभियानांचे उद्घाटन लोकशाही संकल्पवृक्षाला पंचनद्यांचे संकल्पजल अर्पण करून करण्यात आले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी, विधिज्ञ ॲड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे आणि हमीद दाभोलकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शाम्भवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सरचिटणीस महेश म्हेत्रे, भूषण रानभरे, अक्षय जैन, प्रदेश सचिव विश्वजीत जाधव, विकास सुपनार, ओंकार मोरे, नेहल देशमुख, श्रद्धा कांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे गांधीजींच्या सर्वसमावेशक भूमिकेवर काम भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले की, काँग्रेस काळाबरोबर पुढे जात नाही, अशी जनतेची समजूत आहे. ही समजूत दूर करण्यासाठी अधिक एकजुटीने आणि सातत्याने जनतेसमोर जाण्याची गरज आहे. सध्याचे सत्ताधारी एका विशिष्ट आर्थिक प्रारूपाद्वारे सत्ता चालवत आहेत, तर काँग्रेस गांधीजींच्या सर्वसमावेशक भूमिकेवर काम करत आहे. कामगार, श्रमिक, मजूर, कष्टकरी, महिला, शोषित आणि वंचित अशा सर्व समाजघटकांसाठी काँग्रेस कार्यरत असल्याने पक्षाला मोठा जनाधार होता. हा जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी आगामी काळात संघर्ष आणि नवनिर्माण अशा दोन्ही पातळ्यांवर लढावे लागेल, ज्यात युवक काँग्रेसचा पुढाकार महत्त्वाचा ठरेल. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे सत्याशी शत्रुत्व ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी काँग्रेसला केवळ राजकीय पक्ष न मानता समाजकारणाचे माध्यम संबोधले. काँग्रेसच्या परंपरांनी देशाचे भवितव्य घडवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, त्याचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे सत्याशी शत्रुत्व असून, त्यांना आधुनिक मनुस्मृती लागू करायची आहे. त्यामुळे या अभियानांच्या माध्यमातून जनजागृती, संघटन, कृती आणि नवे नेतृत्व अशा क्रमाने प्रवास घडत राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय यंत्रणा, न्यायव्यवस्थेचे राजकीयीकरण ॲड. असीम सरोदे यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा, न्यायव्यवस्थेचे राजकीयीकरण केल्याचा आरोप केला. मानवी हक्कांची पायमल्ली केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. समाजमाध्यमांची व्यासपीठे सस्पेंड केली जात आहेत. आधुनिक मनुवादाचे हे प्रकार आहेत आणि सर्वत्र नकारात्मकता भरून राहिली आहे. युवकांच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होत आहे. सर्व पातळ्यांवर विचारशून्यता आणण्याचा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले. युवा पिढीकडून धारणा आणि धोरण स्तरांवर अपेक्षा डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले, ही अभियाने सातत्यपूर्ण व दीर्घकाळ सुरू राहावीत, ही अपेक्षा आहे. हा प्रारंभ म्हणजे इव्हेंट नव्हे, यामध्ये युवा मनांची लढण्याची वचनबद्धता दिसते आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही धर्मभोळा देश मानवी मूल्यांवर आधारित संविधानावर चालवण्याचे कार्य काँग्रेसच्या पूर्वसुरींनी दीर्घकाळ केले आहे. युवा पिढीच्या कार्यकर्त्यांकडून आता धारणा आणि धोरण, अशा दोन्ही स्तरांवर अपेक्षा आहेत. सत्तेपलीकडचे समाजकारण होणे गरजेचे आहे. एकजुटीशिवाय संघर्षाला अर्थ नाही – स्मिता पानसरे स्मिता पानसरे यांनी बघ्याची भूमिका सोडून बदलांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे, निश्चित भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. कार्यकर्त्यांच्या कृतीमागे वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे, त्याशिवाय विरोधाला टोकदारपणा येत नाही आणि एकजुटीशिवाय संघर्षाला अर्थ उरत नाही. त्यामुळे एकटे, सुटे सुटे लढण्यात, विरोध करण्यात अर्थ नाही. पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून समान मुद्यांवर एकत्र येऊन, समता, बंधुता, न्यायासाठी लढले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
