पुणे पोलिस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना अटक:'व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज' प्रकरणातील कारवाईत एसीबीची कारवाई

0
a11687c3-af0f-4d2f-a6e2-7c46a5b28bfd_1777715207837.jpg




पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर एका खासगी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पुण्यातील कर्वे रस्त्यावरील ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४३ कोटी १९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि वैशाली तोटेवार स्वतः या प्रकरणाच्या फिर्यादी होत्या. या कंपनीचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे सध्या फरार आहेत. तपासादरम्यान ३० कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली होती. याच प्रकरणातील कायदेशीर कारवाईत मदत करण्यासाठी किंवा तपासाची दिशा बदलण्यासाठी तोटेवार यांनी २८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या लाचखोरीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारातच अत्यंत धाडसाने ही कारवाई करण्यात आली. तोटेवार यांनी २८ लाखांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. विशेष म्हणजे, तोटेवार यांची नुकतीच मुंबई लोहमार्ग पोलिस दलात बदली झाली होती आणि त्यांना पुणे येथील कर्तव्यावरून कार्यमुक्तही करण्यात आले होते. तरीही त्यांनी आयुक्तालयात येऊन ही लाच स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या रकमेची लाच एका सहायक पोलिस निरीक्षकाने स्वतःसाठी घेतली की यात आणखी कोणा बड्या अधिकाऱ्याचा हात आहे, याचा तपास एसीबी करत आहे. तोटेवार आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असल्याने या विभागातील इतर कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संपर्कात होते का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज’ने ३०० कोटींची खोटी उलाढाल आणि बनावट ऑडिट रिपोर्ट दाखवून शेकडो नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले होते. नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना देऊन हे रॅकेट चालवले जात होते. आता या फसवणूक प्रकरणाचा तपास करणारी अधिकारीच लाचखोरीत अडकल्याने मूळ घोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुणे पोलिस दलात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed