अभिवक्ता संघ निवडणूक थांबली; पडद्यामागे नेमकं काय सुरू?
नांदेड बार निवडणुकीवर ब्रेक! बार कौन्सिलचा अचानक हस्तक्षेप
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड अभिवक्ता संघाच्या २०२६–२८ या कार्यकाळासाठी होणारी निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून उमेदवारांना याबाबत विशेष सूचना देण्यात आली आहे. नांदेड अभिवक्ता संघाच्या सर्व सदस्यांसह निवडणुकीतील उमेदवारांना कळविण्यात आले की, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
फॅक्ट फाइंडिंग समितीची नियुक्ती
नांदेड अभिवक्ता संघाच्या कार्यपद्धती व सत्यता पडताळणीसाठी त्रिसदस्यीय फॅक्ट फाइंडिंग समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे न नेण्याचे आदेश बार कौन्सिलकडून देण्यात आले आहेत.
समितीची बैठक पार
या पार्श्वभूमीवर २ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता समितीची बैठक नांदेड जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक अधिकारी तसेच अभिवक्ता संघाच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेण्यात आली. समिती लवकरच आपला अहवाल बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली.
उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रिया पुढे ढकलली
बार कौन्सिलच्या पुढील आदेशापर्यंत आज नियोजित असलेली उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतरच निवडणुकीच्या पुढील कार्यक्रमाबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.निवडणूक प्रक्रियेबाबत पुढील सूचना अधिकृतरीत्या कळविण्यात येतील, असे निवडणूक अधिकारी ऍड. अनिल बी.पाटील आणि ऍड. संदीप बी. ढगे यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित बातमी ….
नांदेड जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीला स्थगिती; तथ्यशोधन समिती नियुक्त
Post Views: 10
