लोहगाव पोलिस उपनिरीक्षकाला 80 हजारांची लाच घेताना अटक:गुन्ह्यात मदत करण्यासाठी वरिष्ठांच्या नावावर मागितले पैसे, एसीबीची कारवाई

0
b894b0c7-0a1e-4ee6-92cf-386d49574bb4_1777713013521.jpg




लोहगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. मनोज मधुकर बरुटे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे ३९ वर्षीय व्यावसायिक असून, त्यांच्याविरुद्ध लोहगाव पोलिस स्टेशनमध्ये एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्यासाठी पीएसआय मनोज बरुटे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी होताच, तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान, आरोपी बरुटे यांनी स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठांसाठी म्हणून लाचेची रक्कम वाढवून ८० हजार रुपये देण्याची मागणी केली. ठरल्यानुसार, लोहगाव पोलिस ठाण्याच्या परिसरातच एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना पीएसआय मनोज बरुटे यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या विविध कलमांखाली लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही यशस्वी कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक अजित पाटील, आणि अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास हडके, पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या पथकाने केली आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी किंवा कामात मदत करण्यासाठी जर एखादा लोकसेवक किंवा खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा पुणे कार्यालयाच्या संपर्कात येण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed