नसरापूरमध्ये 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार, निर्घृण हत्या:15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार- पोलिस अधीक्षक संदीप गिल
![]()
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत आंदोलन केले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगत, पुढील 15 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय आरोपीने पीडित बालिकेला खाऊचे आमिष दाखवून जवळच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता. मुलगी घरी न दिसल्याने पालकांनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपीला तातडीने अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिस कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले जाईल. तसेच, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली जाईल, जेणेकरून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळेल. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध करत, आरोपीला कोणत्याही परिस्थितीत माफी मिळू नये अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. स्थानिक ग्रामस्थांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर काही काळ रास्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला. नसरापूर परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
