महाराष्ट्र दिनी संविधान चौकात काळे फुगे सोडले:विधानसभेवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; 10 जण अटकेत
![]()
महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआस) तीव्र निदर्शने केली. संविधान चौकात काळे फुगे सोडून आणि विधानसभेच्या गेटवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करून ‘महाराष्ट्र निषेधदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, तारेश दुरुगकर, रहमान शेख, चंदू शेंडे, तात्यासाहेब मत्ते, चंद्रशेखर पुरी, विजय मोंदेकर, मनीषा पुरी आणि विलास सूर्यवंशी यांचा समावेश आहे. यावेळी ‘महाराष्ट्र दिनाचा निषेध असो’, ‘विदर्भ झालाच पाहिजे!’, ‘विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘जय विदर्भ’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी आदल्या रात्रीपासूनच कारवाई सुरू केली होती. सुनील चोखारे, नरेश निमजे, प्रशांत नखाते, नौशाद हुसैन, शाहिद अनवर आणि प्रशांत जयकुमार यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत आधीच ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक तसेच किरकोळ ढकलाढकलीही झाली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
समितीने राज्य सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, महाराष्ट्र कर्जाच्या खाईत बुडत असून, जनतेच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण आणि प्रदूषण यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेतील कलम 3 नुसार स्वतंत्र विदर्भ राज्याची तत्काळ निर्मिती करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
