चाकण हादरले!:3 वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरला, मृतदेह सुटकेसमध्ये लपवला

0
d1ab04cf-f16f-4175-b609-c470cf84a7a2_1777708658637.jpg




पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील दक्षिण महाळुंगे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षांच्या बालकावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रथम बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर गळा चिरून त्याची हत्या केली. बालकाच्या शरीरावर जखमा आणि गळा चिरल्याचे दिसून आले, ज्यामुळे ही हत्या क्रूरपणे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे बालक घरातून बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन स्थळी बालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे आणि चाकण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ 4 च्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “या गंभीर घटनेची पोलिस प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जात आहे. तपासासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस अधिकृत माहिती देतील. या घटनेमुळे महाळुंगे परिसरात तणाव निर्माण झाला असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संशयित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *