भोंदू अशोक खरातला 9 व्या गुन्ह्यात पोलिस कोठडी:रूपाली चाकणकरांच्या बहिणीची 'ईडी'कडून चौकशी होणार

0
new-project-2026-05-02t101017470_1777696855.jpg




अनेक निष्पाप लोकांना मृत्यूची भीती दाखवून लुटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. भोंदू खरातने एका व्यापाऱ्याला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 ते 5 कोटी रुपये उकळले आहेत. इतकेच नव्हे, तर मृत्यूची भीती दाखवून या व्यापाऱ्याकडून एक महागडी कार स्वतःच्या ताब्यात घेतली आणि नंतर ती कागदोपत्री स्वतःच्या नावावर करून घेतली. सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि सहायक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी न्यायालयात युक्तिवाद करत खरातच्या या गंभीर गुन्ह्यांची माहिती दिली. अशाच प्रकारे त्याने अजून कोणाकोणाची फसवणूक केली आहे, याचा तपास आता पोलिस करत आहेत. ‘ईडी’ चाकणकरांची चौकशी करणार या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा प्रतिभा चाकणकर आणि भोंदू खरात यांचे संबंध समोर आले. तपासादरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खरातला 250 पेक्षा जास्त वेळा कॉल केल्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून (CDR) उघड झाले आहे. याशिवाय, समता पतसंस्थेतील सुमारे 3 कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहारांप्रकरणी ‘ईडी’ आता त्यांची चौकशी करणार आहे. या घटनेमुळे चाकणकर कुटुंबाच्या चौकशीची मागणी राजकीय वर्तुळातून जोर धरू लागली आहे. प्रतिभा चाकणकरांच्या नावाने खाते भोंदू खरातने केवळ फसवणूकच केली नाही, तर अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे. जगदंबा आणि समता पतसंस्थेत खरात हा शेकडो खात्यांचा ‘नॉमिनी’ असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. विशेष म्हणजे, रूपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावानेही एक खाते उघडण्यात आले असून, त्यातील व्यवहारांची आता सखोल चौकशी केली जात आहे. भीती दाखवत 21 देशांची केली सफर केवळ पैशांची लूटच नाही, तर फिर्यादीच्या जीवाच्या भीतीचा फायदा घेत खरातने चक्क 21 देशांची सफर फिर्यादीच्याच खर्चाने केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भोंदू खरातने फिर्यादीला जाळ्यात ओढण्यासाठी ‘परिस’ शक्तीचे आमिष दाखवले होते. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांचे भ्रमण करावे लागेल आणि तसे न केल्यास साक्षात ‘नागदेवता’ तुला दंश करेल, ज्यामध्ये तुझा मृत्यू निश्चित आहे, अशी भीषण भीती त्याने घातली. या मृत्यूच्या भीतीपोटी फिर्यादीने खरातच्या २१ देशांतील प्रवासाचा आणि तिथे राहण्याचा सर्व खर्च उचलला. लोकांच्या श्रद्धेचा आणि भीतीचा वापर करून खरातने परदेशात लाखो रुपयांची मौज-मजा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *