बारावीचा आज निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर; 'असा' पाहा तुमचा निकाल अन् डाऊनलोड करा मार्कशीट
![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येतील. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राजभरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये सर्वाधिक संख्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची आहे. शाखांनुसार तपशील खालीलप्रमाणे विज्ञान शाखा: 7,99,773 विद्यार्थी कला शाखा: 3,80,692 विद्यार्थी वाणिज्य शाखा: 3,20,152 विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम: 27,378 विद्यार्थी आयटीआय शाखा: 4,492 विद्यार्थी राज्यातील 9 विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली असून, आज सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध होईल. कुठे पाहायचा निकाल? महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल ‘mahahsscboard.in’ या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. त्यासाठी वेबसाइटवरील “एचएससी परीक्षा निकाल 2026” या लिंकवर क्लिक करून आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव अचूकपणे प्रविष्ट करावे लागेल. या सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून “निकाल पहा” या पर्यायावर क्लिक करताच विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअरकार्ड सहजपणे ऑनलाइन तपासता येईल. कसा पाहायचा निकाल? इयत्ता 12वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. निकाल जाहीर होताच लाखो विद्यार्थी एकाच वेळी लॉगिन करत असल्याने वेबसाईट मंदावण्याची शक्यता असते. अशा वेळी ब्राउझरचा कॅशे साफ करणे, एकाच वेळी विविध टॅबमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट उघडून ठेवणे किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करणे सोयीचे ठरेल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भविष्यातील संदर्भासाठी आपली गुणपत्रिका डाऊनलोड करून घ्यावी किंवा तिची प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.
