विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-01t183402776_1777640679.jpg




महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या आपल्या लाडक्या अजितदादाचे निधन झाले यावर सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नव्हता. मात्र हळूहळू त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या लाखो जनतेने हे कटू सत्य पचवले. अजित पवारांचे निधन झाले, मात्र चर्चा सुरू झाली ती काळ्या जादूची! अजित पवारांचे निधन झाले आणि त्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले, जे आजही लावले जात आहेत. आजही हा चर्चेचाच विषय आहे. कोणी म्हणतं की हा घातपात आहे, कोणी म्हणतं हे ठरवून केलंय, कोणाला वेगळीच शंका आहे, तर कोणाला याचा संबंध थेट काळ्या जादूसोबत असल्याचाही दाट संशय आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशीच त्यांच्या बारामती येथील निवसस्थानाबाहेर भानामतीचा प्रकार केल्याचे उघड झाले होते. इथपासून सुरू झालेला हा विषय थेट नाशिकचा भोंदू अशोक खरातपर्यंत येऊन पोहोचले. त्याच्या जवळचे असलेले लोक म्हणजे रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, जे अजित पवारांच्याच पक्षातले. मग पुन्हा तर्क-वितर्क लावले गेले. ‘पक्ष बळकावण्यासाठी अजितदादांच्याच नेत्यांनीच असला काही प्रकार केला’ अशीही चर्चा सुरू झाली. असो. विषय हा आहे की आजही पुरोगामी महाराष्ट्रात काळी जादू, भानामती, बाहुलीला सुया टोचणे, करणी करणे, लिंबाला सुया टोचणे, असे अनेक प्रकार सर्रास सुरू आहेत. अशोक खरात सारख्या व्यक्तीने तर अक्षरशः लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेण्यात कुठलीच कसर सोडली नाही. लोकांच्या भोळेपणाला, त्यांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणारे असंख्य बाबा-बुवा अजूनही महाराष्ट्रात आहेत, हे तर आपल्याला मागच्या दोन महिन्यात प्रकर्षाने दिसून आले आहे. आजही असे अनेक बाबा बाहेर निघत आहेत. नाशिकचा अशोक खरात, नाशिकचाच रवींद्र एरंडे, स्वतःला बाळूमामांचा अवतार म्हणवणारा मनोहर भोसले, माझ्यात दिव्य शक्ती असल्याचे सांगणारा आणखी एक पुण्यातला, असे कितीतरी भोंदू बाहेर निघत आहेत. लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेत यांनी नको ते कृत्य केली आहेत आणि कोट्यवधी पैसे कमावले. याचे कारण काय? तर अंधश्रद्धा! अंगावरोनि भस्म फांसे। तेणें काय होय संन्यासे॥
चित्त नाहीं शुद्ध। जपतसे भोंदू॥
तुका म्हणे भोंदू। ते जाणावे निषिद्धु॥ संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी आहेत. याचा अर्थ असा की अंगाला भस्म लावून कोणी संन्यासी होत नाही, जर मन शुद्ध नसेल तर ते भोंदू आहेत. अशा लोकांना दूर ठेवावे. हे त्यांनी त्या काळात सांगून ठेवले आहे. पण आपण ठेवले का दूर अशा भोंदू लोकांना? तसेच “तुका म्हणे अभावना। भावीं मूळ तें पतना॥” अर्थात जर आपण अंधश्रद्धावान व्यक्तींचे संघटन केले तर आपली बुद्धी भ्रष्ट होऊन नाशास कारणीभूत ठरते. संत तुकडोजी महाराज यांच्या शब्दांत म्हणायचे झाले तर.. बुवाबाजी भुलवी जना ।
भ्रष्ट करी लोकजीवना ।
फसवुनी भोळ्या बापड्यांना।
भलत्या छंदा लावती
चमत्काराच्या भरी भरोनी ।
झाली अनेकांची धूळधाणी ।
संत-अवतार यापुढे कोणी ।
नका वर्णू सज्जनहो । संत तुकाराम असतील किंवा इतर अनेक संतांनी त्या काळात देखील अंधश्रद्धेच्या विषयी लोकांना जागरूक करण्याचे काम केले, याचा अर्थ अंधश्रद्धा त्याही काळात होतीच आणि आजही आहेच. मग प्रश्न पडतो की महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र नक्कीच पुरोगामी आहे. मात्र, अंतर्गत महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती पाहता, आहोत का आपण पुरोगामी? असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रातील अंधश्रद्धेचा इतिहास महाराष्ट्रातील अंधश्रद्धेचा इतिहास हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि प्रदीर्घ आहे. एकीकडे महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते, जिथे प्रबोधनाची मोठी परंपरा आहे, तर दुसरीकडे याच भूमीत अनेक अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धांनी दीर्घकाळ मुळ धरले होते. महाराष्ट्रातील अंधश्रद्धेच्या इतिहासाचे प्रमुख टप्पे खालीलप्रमाणे मांडता येतील: 1. मध्ययुगीन काळ आणि धार्मिक कर्मकांड मध्ययुगीन कालखंडात समाजात अज्ञान आणि निरक्षरतेचे प्रमाण मोठे होते. नैसर्गिक आपत्ती, आजारपण किंवा संकटांचे मूळ ‘दैवी कोप’ किंवा ‘अमानवी शक्ती’मध्ये असल्याचे मानले जात असे. या काळात नरबळी, पशुबळी, सती प्रथा, आणि केशवपन यांसारख्या प्रथा धर्माच्या नावाखाली पाळल्या जात होत्या. ग्रामीण भागात आजही भानमती आणि करणी-बाधा या शब्दांचा प्रभाव दिसतो, परंतु मध्ययुगीन काळात ‘जादूटोणा’ यांसारख्या प्रकारांमुळे भीतीचे वातावरण असे. 2. 18 वे आणि 19 वे शतक ब्रिटीश राजवटीच्या आगमनानंतर पाश्चात्य शिक्षणामुळे महाराष्ट्रात वैचारिक क्रांती झाली. अनेक समाजसुधारकांनी अंधश्रद्धेविरुद्ध उघड भूमिका घेतली. उदाहरणार्थ: महात्मा जोतिराव फुले: त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’च्या माध्यमातून कर्मकांडांवर प्रहार केला. पुरोहिताशिवाय लग्न लावण्याची पद्धत सुरू करून त्यांनी धार्मिक अंधश्रद्धेचे मूळ कापण्याचा प्रयत्न केला. गोपाळ गणेश आगरकर: ‘सुधारक’ पत्रातून त्यांनी बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला. जे बुद्धीला पटत नाही, ते नाकारावे हा विचार त्यांनी मांडला. राजर्षी शाहू महाराज: त्यांनी आपल्या संस्थानात अघोरी प्रथांवर बंदी आणली आणि शिक्षणाचा प्रसार करून लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. 3. 20 वे शतक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. आंबेडकरांनी अंधश्रद्धेला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक गुलामगिरीचे कारण मानले. त्यांनी ‘काळाराम मंदिर सत्याग्रह’ आणि त्यानंतर ‘धम्मचक्र प्रवर्तन’ या माध्यमातून विवेकवादाची शिकवण दिली. त्यांनी जनतेला अंधश्रद्धायुक्त कर्मकांडातून बाहेर काढून विज्ञानाभिमुख होण्याचे आवाहन केले. 4. आधुनिक काळ आणि संघटित चळवळ स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक संघटित स्वरूपात सुरू झाले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी 1989 मध्ये ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ची स्थापना केली. त्यांनी गावोगावी जाऊन चमत्कार करणाऱ्या बुवा-बापूंचे पितळ उघडे पाडले. जादूटोणाविरोधी कायदा: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि डॉ. दाभोळकरांच्या बलिदानानंतर, 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवी, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम’ मंजूर केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. 5. महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक अंधश्रद्धांचे स्वरूप देवदासी प्रथा: धर्माच्या नावाखाली मुलींना देवाला अर्पण करणे, ही एक मोठी सामाजिक अंधश्रद्धा होती. चमत्कार आणि बुवाबाजी: आजही अनेक लोक संकटात सापडल्यावर वैज्ञानकि उपायांपेक्षा ‘अंगारा-धुपारा’ किंवा बुवांच्या मागे धावताना दिसतात. ग्रह-तारे आणि भविष्य: शुभ-अशुभ काळ, राहू-केतू यांसारख्या संकल्पना आजही मध्यमवर्गीय समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. अंधश्रद्धेच्या मानसिकतेमागे वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अभाव- हमीद दाभोळकर आपण थेट डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे सुपुत्र व मानसोपचारतज्ञ तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. अंधश्रद्धेच्या संदर्भात ते म्हणतात की, अंधश्रद्धेची मानसिकता तयार होण्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अभाव ही सगळ्यात मोठी बाब आहे. शालेय शिक्षणात आपल्याकडे कार्यकारणाभाव शिकवला जात नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते आणि ते आपण तपासून बघायला पाहिजे, हा संस्कारच शालेय वयात केला जात नाही आणि त्यातूनच अंधश्रद्धेची मानसिकता तयार होते. पुढे बोलताना हमीद दाभोळकर म्हणाले, त्याचसोबत टोकाच्या भीतीमुळे किंवा टोकाच्या हव्यासामुळे देखील लोक अंधश्रद्धांना बळी पडतात. या सगळ्यातून वाचायचे असेल तर शालेय वयापासूनच अंधश्रद्धेच्या विरोधातली मानसिकता मुलांच्यामध्ये तयार करणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना प्रश्न विचारायला शिकवणे आवश्यक आहे. आणि कुठलीही गोष्ट कुठल्यातरी धर्मग्रंथात लिहिली आहे म्हणून किंवा कुठलीतरी ज्येष्ठ व्यक्ती सांगतीये म्हणून मान्य करण्याऐवजी आपल्या बुद्धीच्या माध्यमातून ती तपासून बघून शोधक वृत्तीने चिकित्सा करून त्यानंतरच निष्कर्षावर येणे आवश्यक आहे. ‘विद्यानाची सृष्टी घेतली, पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही’ डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्याशी देखील आम्ही फोनद्वारे संपर्क करत त्यांचे याविषयीचे मत जाणून घेतले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर अतिशय योग्य शब्दात आपले विचार मांडले आहेत. त्या म्हणाल्या, डॉ. दाभोळकर नेहमी एक वाक्य म्हणायचे की आपण विद्यानाची सृष्टी घेतली, पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. विज्ञानाची सरणी घेतली, पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे कुठल्यातरी दैवी मार्गाने सुटू शकतील यावर समाजातील बऱ्याच लोकांचा विश्वास असतो. कारण त्यांनी लहानपणापासून अशा पद्धतीने प्रयत्न करणारे लोक बघितले असतात, त्यांच्या आजूबाजूला राहणारे, घरातलेच काही लोक असतात. त्यामुळे हा ठाम संस्कार असतो त्यांच्या मनावर. पुढे बोलताना मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेत वैज्ञानिक दृष्टिकोणाचा खोलवर संस्कार होत नाहीत. की जेवढा पुरावा तेवढा विश्वास या पद्धतीनेच आपण आपला विश्वास कोणालातरी बहाल केला पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टींचा तपास केला पाहिजे. हा संस्कार शिक्षण व्यवस्थेतून होत नाही. याचे अगदी उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा पहिल्यांदा लोक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे भाषण ऐकतात तेव्हा ते ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्यावरून लक्षात येते की आपण जे अनुभवतो आहोत त्याबद्दल वेगळा विचार किंवा त्याविषयी चिकित्सक विचार करण्याची कोणतीही सुरुवात झालेली नसते, हे लक्षात येते त्यांच्या प्रश्नांवरून. मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, तसेच समाजातले प्रथितयश लोक असतात ते या गोष्टी करताना लोकांना दिसतात. म्हणजे नुकतेच आपण बघितले की माजी सरन्यायाधीश भूषण गवई बागेश्वरधाम बाबाकडे गेलेत. तर तेव्हा अशा प्रकारचे समाजात मान्यता पावलेले लोक बुवाबाजीचा आसरा घेताना दिसतात तेव्हा लोकांना असे वाटू शकते की खरोखर काहीतरी म्हणजे इतके शिकलेली माणसं जात आहेत, तर काहीतरी त्यात असणार. किंवा अनेक नट नटी त्यांच्या बोलण्यातून अमुक-अमुक बाबांचा, स्वामींची कृपा झाली किंवा मला हा अनुभव आला वगैरे सांगात असतात. तसेच सोशल मीडियाच्या काळात याची एक माणसाच्या आजूबाजूला एक इकोसिस्टमच तयार झाली आहे. सतत त्याला प्रश्न सोडवण्यासाठीचे असे मार्ग रीलच्या माध्यमातून दिसत असतात. पूर्वीच्या काळी कोणाकडे तरी जावं हा विचार आल्यानंतर त्याच्यावर कार्यवाही करायला काही दिवसांचा कालावधी लागायचा, आता तुम्ही एक बटन दाबले की त्या बाबाचे मेसेज सुरू होतात.एका बाजूला प्रयत्नवादी विचारांनीच प्रश्न सुटात असा दृढ संस्कार नाही, दुसऱ्या बाजूला अत्यंत मोठ्या प्रमाणात या लोकांची अव्हेलेबलिटी. पुढे बोलताना मुक्ता दाभोळकर यांनी अशोक खरात प्रकरणावर देखील भाष्य करत म्हटले की, खरात प्रकरण पाहिले तर प्रत्यक्ष ते एवढ्या भयाण शोषणाकडे गेलं आणि त्याचे सुरुवातीचे ट्रॅप हे ज्योतिष होतं, तिथून त्याची सुरुवात झाली. तर ज्याला समाजात मान्यता आहे अशा गोष्टीचा ट्रॅप लाऊन पुढे अधिक शोषणाकडे माणसाला नेले जाते. त्यामुळे असे जे काही ट्रॅप्स आहेत, ते खोटे आहेत आणि यासाठी किमान ग्राहक संरक्षण कायदा लावला पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलावत आहात न ज्योतिष सांगण्यासाठी आणि त्याचे पैसे सुद्धा घेत आहात. तर ते ज्योतिष खोटे ठरल्यावर तुम्ही ग्राहक संरक्षणाकडे गेले पाहिजे, ज्योतिष, वास्तूच्या नावाखाली एखाद्या बाबाकडे जाणे हे आपल्याकडे अजूनही आक्षेपार्ह मानले नाही. त्यामुळे याला जर ग्राहक संरक्षण न्यायालयाच्या कक्षेत आणले तर लोक यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात करतील, असे मत मुक्ता दाभोळकर यांनी मांडले आहे. शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोण मिळायला हवा- डॉ. रश्मी बोरीकर छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ समाजसेविका व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या डॉ. रश्मी बोरीकर यांनी देखील महाराष्ट्रातील सध्याच्या भोंदू बाबांच्या प्रकरणांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात ज्या मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीची जे प्रकार उघडकीस येत आहेत, त्याविषयी विचार करताना असे जाणवते की सामान्य माणूस अशा बुवाबाजीच्या नादी का लागत असावा? प्रामुख्याने असे वाटते की शिक्षणातून जो वैज्ञानिक दृष्टिकोण मिळायला पाहिजे तो कदाचित आपण लोकांना देऊ शकत नाहीत. पुढे बोलताना डॉ. रश्मी बोरीकर म्हणाल्या, त्याच प्रमाणे भविष्यातील ज्या काही अज्ञात गोष्टी आहेत, त्याविषयी माणसाच्या मनात असणारी भीती आणि स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास न ठेवता काहीतरी सोप्या मार्गाने आपल्याला भविष्य सुकर करता येईल का? याची कुठेतरी सुप्त आशा माणसाच्या मनात असते आणि त्यातून आपल्याला सामान्य माणूस हा बुवाबाजीच्या नादाला लागलेला दिसतो. तसेच डॉ. रश्मी बोरीकर म्हणाल्या की, विशेषतः महिला आपल्याला या सगळ्या प्रकारांना जास्त बळी पडलेल्या दिसतात. याचे कारण म्हणजे वर्षानुवर्षे आपण जे बघतो ते महिला या नुसत्या अंधश्रद्धेच्या बळी नाही, तर त्या अंधश्रद्धांच्या, परंपरांच्या वाहकही आहेत. त्यामुळे एक सरासार विचार करून, वैज्ञानिक दृष्टिकोण ठेऊन त्या निर्णय घेऊ शकत नाहीत, असे मत बोरीकर यांनी मांडले आहे. असुरक्षिततेतून पटकन मार्ग काढण्यासाठी बुवाबाजी वाढली – डॉ. संदीप सिसोदे आपल्याला माहीत आहे की लोक भीतीमुळे किंवा स्वार्थासाठी तसेच आज्ञानातून अशा बाबा-बुवांच्या नादी लागून अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. मात्र यामागे नेमकी मानसिकता कशी असते? यासाठी आपण मानसोपचारतज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. संदीप सिसोदे यांच्या म्हणण्यानुसार, अनेक समस्या जेव्हा संसारात येतात, अनिश्चितता किंवा असुरक्षितता जन्माला येते त्यातून पटकन मार्ग मिळवा. कमी कष्टातून कोणीतरी मला मार्ग सांगावा. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत, त्या गोष्टी माझ्या नियंत्रणात याव्यात याच्यासाठी प्रयत्न करावेत, असे अनेक समस्यांमधून बुवाबाजी आणि बाबांवरचा विश्वास वाढला जातो. पुढे डॉ. संदीप सिसोदे सांगतात की, ही एक प्रकारची मास हिस्टेरिया अशी सायकॉलॉजीकल टर्म म्हणू शकतो. दहा पैकी एखादी गोष्ट कोणत्यातरी भक्ताची योगायोगाने बरोबर झालेली असते आणि त्या एकाच गोष्टीची चर्चा त्या पूर्ण समाजात होत असते आणि त्यामुळेच तो बाबा किती चमत्कारी आहे, तो किती हुशार आहे, अशा प्रकारचा विश्वास बसायला लागतो. हे पूर्णपणे हिस्टेरिया असणाऱ्या लोकांचे काम आहे, ज्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी आहे, असे लोक बुवाबाजीकडे वळतात. तसेच वैद्ययानिक दृष्टिकोण जर आपण बाळगला, तर नक्कीच थोडा वेळ लागतो पण योग्य मार्ग मिळतो आणि समस्याचे उत्तर सुद्धा मिळते, असे सिसोदे यांनी म्हटले आहे. शेवटी जाता जाता कवी मंगेश पाडगावकर यांनी अंधश्रद्धेवर लिहिलेली कविता पाहूया.. माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली… आधार नाही, प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा जो काढील सार्‍या उवा, मनातील चिंतेच्या आधी म्हणायचे जय साई , मगचि अधिकारी लाच खाई अजून पकडला गेला नाही, कृपा मानी बाबांची आपण शोधायचे नाही, आपण लढाईचे नाही आपण भिडायचे नाही आयुष्याला….. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार … बुवा नाम जपाचा उच्चार … नशा देई …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed