व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली 'रिअल लाईफ', काय आहे मेंदूचा ताबा घेणाऱ्या या 'कल्चर'ची मेख!

0
gif_1777618886.gif




हातातील स्मार्टफोन, समोर असलेला कॅमेरा आणि बॅकग्राउंडला वाजणारं एखादं ट्रेंडी म्युझिक… सध्याच्या तरुणाईसाठी हेच सर्वस्व बनलं आहे. पण या 15 ते 20 सेकंदांच्या ‘रील्स’च्या नादात आपण आपलं खरं आयुष्य (रिअल लाईफ) हरवून बसलो आहोत का? एखादं रील व्हायरल व्हावं म्हणून जिवाचा सौदा करणाऱ्या तरुणाईला नेमकं कसलं व्यसन लागलं आहे? या ‘रील कल्चर’ची मेख आणि त्यामागचं विदारक वास्तव मांडणारा हा विशेष रिपोर्ट… व्हायरल होण्याचा जीवघेणा प्रवास सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ओढ आज इतकी वाढली आहे की, तरुणांना स्वतःच्या जिवाचेही भान उरलेले नाही. रेल्वेच्या टप्प्यावर स्टंट करणे, भरधाव वेगात गाड्या चालवत स्वॅग दाखवणे किंवा धोकादायक कड्यांवर उभे राहून व्हिडिओ बनवणे, अशा घटनांमध्ये दररोज कित्येक तरुण आपला जीव गमावत आहेत. ‘व्ह्यूज’ आणि ‘लाईक्स’च्या शर्यतीत मृत्यूचा धोका पत्करणारी ही पिढी नक्की कुठे चालली आहे, हा मोठा प्रश्न आहे. समृद्धी महामार्गावर चालकाचे रील वेड अन् दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू (एप्रिल 2026) घटना: एप्रिल 2026- समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. काय घडले?: बस चालवत असताना चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात मग्न होते. त्यांचे लक्ष रस्त्यावरून विचलित झाल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला, तर 25 प्रवासी जखमी झाले. ही माहिती बसमधील प्रवाशांनीच सांगितली. संपूर्ण बातमी वाचा साताऱ्यातील पाटणमधील घटना: रीलसाठी स्टंट करताना कार थेट दरीत कोसळली काय घडले?: साताऱ्याच्या पाटण तालुक्यात एका धक्कादायक घटनेत, इंस्टाग्राम रीलसाठी धोकादायक स्टंट करत असताना चालकाची कार 300 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना नऊ महिन्यांपूर्वीची आहे. संपूर्ण बातमी वाचा अमरावतीचे पडसाद: रील्सच्या दुनियेतील काळे वास्तव रील्सचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर गुन्हेगारीसाठीही होऊ लागला आहे. अमरावतीमध्ये समोर आलेले ब्लॅकमेलिंगचे प्रकरण याचे जिवंत उदाहरण आहे.रील्सच्या माध्यमातून ओळख करून घेणे, मग संवाद वाढवून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणे आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल करणे, ही एक नवी सामाजिक विकृती समोर आली आहे. आभासी जगातील ही ओळखी प्रत्यक्षात किती धोकादायक ठरू शकतात, हे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. बातमी वाचा अहिल्यानगरमधील घटना: फाशीचे रील बनवताना खरोखरच बसला फास अहिल्यानगर एक तरुण फाशी घेतानाचा रील बनवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, यावेळी त्याला खरोखरच फास बसला. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना अहिल्यानगर येथील जामखेड शहरात घडली. संपूर्ण बातमी वाचा नाण्याची दुसरी बाजू: संधीचं सोनं करणारी तरुण पिढी रील्स म्हणजे फक्त विनाशच नाही. अनेक कल्पक तरुणांनी या माध्यमाचा वापर करून आपले आयुष्य समृद्ध केले आहे. ग्रामीण भागातील तरुण शेतकरी रिल्सच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे प्रयोग जगाला दाखवत आहेत. अनेक शिक्षक अवघड विषय सोप्या भाषेत रील्सद्वारे शिकवत आहेत. गायन, वादन यांसारख्या कलांना रील्समुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, त्यातून अनेकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. ही रील्सची सकारात्मक बाजू आहे, जिथे कलेचा सन्मान होतो. स्टंट नको, टॅलेंट दाखवा! (अथर्व सुदामेचं उदाहरण) रील्स म्हणजे फक्त डान्स किंवा धोकादायक स्टंट्स नव्हेत. जर तुमच्याकडे खरी कला असेल, तर हेच रील्स तुमचं नशीब बदलू शकतात. “रील्स म्हणजे केवळ स्टंट नव्हे, तर ती तुमची कल्पकता सिद्ध करण्याची संधी आहे. अथर्व सुदामेसारख्या तरुणांनी निखळ मनोरंजन आणि सामाजिक संदेशाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, तर रील्स हे यशाचं रॉकेट ठरू शकतं. अशा प्रकारे अनेक तरुण सकारात्मक कामातून मोठी कमाई आणि नाव कमवत आहेत. तज्ज्ञ काय म्हणतात? (मानसोपचारतज्ज्ञांचे मत) या संपूर्ण विषयावर प्रकाश टाकताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी रील्सच्या वाढत्या क्रेझमागील मानसिक पैलू सविस्तरपणे मांडले असून, त्यांनी दिलेली महत्त्वाची माहिती पुढील मुद्द्यांद्वारे पाहूया.. डोपामाइन लूप आणि तात्काळ आनंद
जेव्हा एखादी व्यक्ती रील पाहते किंवा तिला रीलवर लाईक्स मिळतात, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन हे ‘फील गुड’ रसायन स्रवते. यामुळे तात्काळ तात्पुरता आनंद मिळतो. हा आनंद क्षणभंगुर असल्याने, मेंदूला पुन्हा पुन्हा तोच अनुभव हवा असतो, ज्यातून रील पाहण्याचे किंवा बनवण्याचे व्यसन जडते. ‘व्हॅलिडेशन’ची ओढ “मी कसा दिसतो/दिसते?” किंवा “माझे आयुष्य किती छान आहे?” हे इतरांना दाखवून त्यांच्याकडून दाद मिळवण्याची ओढ वाढली आहे. सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंट्स हे व्यक्तीच्या आत्मसन्मानाचे मोजमाप बनले आहेत. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास तरुणांमध्ये नैराश्य किंवा चिडचिड वाढताना दिसते. जीवघेणी स्पर्धा आणि ‘एन्डोर्फिन’चा अभाव काहीतरी वेगळे आणि चित्तथरारक करून दाखवण्याच्या नादात अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालतात. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी धोक्याची जाणीव विसरणे, हे आवेग नियंत्रण कमी झाल्याचे लक्षण आहे. केवळ व्ह्यूजसाठी रेल्वे रुळावर किंवा कड्यावर उभे राहून रील बनवणे ही एक गंभीर मानसिक विकृती बनत चालली आहे. उत्पन्नाचे साधन की आभासी मृगजळ? काही लोक यातून नक्कीच पैसे कमवत आहेत, ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येकालाच ते साध्य होईल असे नाही. केवळ पैशांच्या आमिषाने तासनतास त्यात घालवल्यामुळे क्रिएटिव्हीटी कमी होऊन कॉपी करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी सांगितलेले यावरील उपाय… इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’कडून ‘डिलेड ग्रॅटिफिकेशन’कडे: आजच्या पिढीला सर्वकाही लगेच हवे असते. रील हे त्याचेच स्वरूप आहे. उपाय: मुलांना किंवा तरुणांना अशा कामांत गुंतवा जिथे यश मिळायला वेळ लागतो. उदा. चित्रकला, एखादे वाद्य शिकणे किंवा मैदानी खेळ. “लगेच मिळणारा आनंद हा तात्पुरता असतो आणि कष्टाने मिळणारा आनंद टिकणारा असतो,” हे बिंबवणे आवश्यक आहे. ‘FOMO’ ऐवजी ‘JOMO’ चा स्वीकार FOMO (Fear of Missing Out): “दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले आहे किंवा काय ट्रेंड सुरू आहे, हे मला माहित नसेल तर मी मागे पडेल,” ही भीती. JOMO (Joy of Missing Out): “मला सर्वच गोष्टी माहित असण्याची गरज नाही, मी माझ्या स्वार्थासाठी (Self-peace) काही गोष्टी सोडून देऊ शकतो,” हा आनंद. उपाय: आठवड्यातून एक दिवस ‘नो सोशल मीडिया डे’ पाळण्याचे आवाहन करा. ‘स्क्रीन टाइम’चे ‘क्रिएटिव्ह टाइम’मध्ये रूपांतर: केवळ रील बघत राहणे (Passive Consumption) हे मेंदूला थकवते. उपाय: जर कोणाला रील बनवायची आवड असेल, तर त्यांना ‘अभिनय’, ‘लेखन’ किंवा ‘व्हिडिओ एडिटिंग’ यांतील तांत्रिक कौशल्ये शिकण्यासाठी प्रवृत्त करा. रील ही ‘सर्जनशीलतेचे प्रदर्शन’ असावी, ‘वेळेचा अपव्यय’ नाही. मुलांच्या संदर्भात: ‘डिजिटल को-पॅरेंटिंग’: केवळ मोबाइल काढून घेणे हा उपाय नाही. पालकांनी स्वतः ‘रोल मॉडेल’ बनावे. जर आई-बाबा सतत फोनवर असतील, तर मुलेही तेच करणार. रंगभूमी आणि कलेचा आधार: एक मानसशास्त्रीय पैलू असा आहे की, प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे असते. उपाय: ज्या तरुणांना रीलमधून प्रसिद्धी हवी आहे, त्यांना स्थानिक नाट्यसंस्था, वकृत्व स्पर्धा किंवा कला मंडळांशी जोडावे. रंगमंचावर मिळणारी दाद ही रीलच्या ‘लाईक्स’ पेक्षा कितीतरी अधिक मानसिक समाधान देते,
आर्थिक साक्षरता आणि वास्तव उपाय: रीलमधून पैसे मिळवणे हे वाटते तितके सोपे नाही, हजारो लोकांपैकी एखादाच यशस्वी होतो. त्यामुळे केवळ ‘इन्फ्लुएन्सर’ होण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा, आपले शिक्षण आणि करिअर सुरक्षित ठेवून फावल्या वेळेत छंद म्हणून याकडे पहावे. महत्त्वाचा संदेश: मानसिक आरोग्य ही आपली खाजगी जबाबदारी आहे. आपण स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवतो, तेव्हा तंत्रज्ञान आपले गुलाम बनते; अन्यथा आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed