सिद्दीकींना भावूक होऊन नाही, तर मेरिट पाहून उमेदवारी- मंत्री भरणे:म्हणाले- अमोल मिटकरींचा 'गैरसमज' झाला असावा

0
new-project-2025-09-20t1655406871758367487_1777684759.jpg




विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला डावलल्याची खंत व्यक्त करत थेट बंडाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मैदानावर उतरत हा निर्णय भावनेच्या भरात नाही, तर मेरिटवर आधारित आहे, असे सांगत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करताना पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मला उमेदवारी नाकारताना पक्षाने साधं विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाचा संदर्भ देत, याबद्दल प्रश्न विचारल्याचे फळ मला मिळाले का? असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे. भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात जे सोबत असतील, त्यांच्यासोबत मी जाईन, असे विधान करून मिटकरींनी आपण पक्षाच्या चौकटीबाहेर विचार करू शकतो, असे मोठे संकेत दिले आहेत. मिटकरींना गैरसमज झाला असावा- भरणे मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मिटकरी यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. पक्षात प्रत्येक निर्णय हा सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जातो. बाबा सिद्दीकी यांचे मुंबईच्या विकासातील आणि पक्षातील योगदान मोठे आहे. झिशान सिद्दीकी हे स्वतः अनुभवी आमदार राहिले आहेत. त्यामुळे केवळ सहानुभूती म्हणून नाही, तर त्यांची ज्येष्ठता आणि मुंबईतील राजकीय समीकरणे पाहूनच सुनेत्रा वहिनींनी हा निर्णय घेतला आहे. म्हणून सिद्दिकींना संधी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेसाठी पक्षाने झिशान सिद्दिकींना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे बाबा सिद्दिकी हे पहिले बडे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सिद्दिकी कुटुंबाची राजकीय वारसदारी झिशान सिद्दिकी समर्थपणे सांभाळत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या याच निष्ठेचा विचार करून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाने अजितदादांचा वादा पूर्ण केला – झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दिकी म्हणाले की, मी वहिनी साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांचे आभार मानतो. त्यांनी मला एक संधी दिली. अजितदादांचा जो वादा होता, तो त्यांनी पूर्ण केला. माझ्यासारख्या युवा नेतृत्त्वाला त्यांनी विधान परिषदेत पाठवले. देशातील युवा वर्गाला राष्ट्रवादी पक्षाशी जोडण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवेल. वहिनी साहेबांच्या नेतृत्त्वा महिला सक्षमीकरणासाठी काम करू. आपले दु:ख बाजुला ठेवून आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed