उजनी 5 मे च्या दरम्यान ‘मायनस’मध्ये सिंचनासाठी 10हजार क्युसेक विसर्ग:धरणातून रोज 2% घट, धरण पाणी साठा व्यवस्थापन कळीचा मुद्दा ठरणार
![]()
सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. येत्या ५ मेपर्यंत धरण ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या सिंचन आवर्तनामुळे दररोज सुमारे १.१४ टीएमसी (२.१२ टक्के) पाणी सोडले जात असल्याने पाणी पातळी कमी होत आहे. एल निनोचे सावट घोंघावत असल्याने धरण पाणी व्यवस्थापन कळीचा मुद्दा ठरणार आहे. उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ३० एप्रिल २०२६ रोजी ६९.६८ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा केवळ ६.०२ टीएमसी (११.२४ टक्के) इतकाच शिल्लक आहे. भीमा नदी, मुख्य कालवा, भीमा-सीना जोड कालवा आणि इतर सिंचन योजनांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा परिस्थिती काहीशी सुधारलेली असली तरी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. २०२४ – वजा ४२.५२ टक्के (पाणीसाठा ४०.८८ टीएमसी) २०२५ – १५.११ टक्के (पाणीसाठा ५५.५७ टीएमसी) मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४ टीएमसी पाणी अधिक आहे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे १४ टीएमसी पाणी अधिक शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्व सिंचन योजनांतून पाणी सुरू असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुरेसा पुरवठा होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. उजनी धरणातील पाणी साठा मुख्यतः पुणे जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असतो. धरण साखळीतील वरील भागातील धरणे भरल्यानंतरच उजनीत पाणी जमा होण्यास सुरुवात होते. आषाढी वारीदरम्यान पाऊस कमी झाल्यास नदीतून पाणी सोडण्याची वेळ येते, त्यामुळे साठ्यावर अतिरिक्त ताण पडतो. हंगामात १०.२० टीएमसी पाण्याचे होते बाष्पीभवन बाष्पी भवनामुळेही पाण्याची लक्षणीय घट होत आहे. रब्बी हंगामात (१५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी) ४.६७ टीएमसी पाणी बाष्पीभवन झाले, तर १ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान आणखी १.६० टीएमसी पाणी कमी झाले आहे. पावसाळ्यापर्यंत सुमारे ४ टीएमसी पाणी वाफ होऊन जाण्याचा अंदाज असून एका हंगामात एकूण १०.२० टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे कमी होते. २ वर्षांची १ मे रोजीची स्थिती
