सिंहगड किल्ल्यावरून तरुणीची उडी मारत आत्महत्या:चिंचवड येथील 28 वर्षीय तरुणीचा मृतदेह दरीत आढळला

0
3f82185d-34ae-4cad-be35-15d22c1a0ab4_1777621079499.jpg




सिंहगड किल्ल्याच्या तूपखाना परिसरातील बुरुजावरून उडी मारून एका 28 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी चिंचवड परिसरातील बिजलीनगर येथे राहत होती आणि मूळची नांदेडची रहिवासी होती. ती 28 एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना या तरुणीबाबत माहिती देण्यात आली होती. तांत्रिक तपासानंतर तरुणी सिंहगड किल्ला परिसरात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हवेली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक फौजदार गिरे, प्रवीण ताकवणे आणि त्यांच्या पथकाने तरुणीचा शोध सुरू केला. पोलिसांनी शोधमोहिमेत गिर्यारोहकांच्या पथकाची मदत घेतली. मध्यरात्रीपर्यंत तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधमोहीम राबवल्यानंतर तरुणीने सिंहगड किल्ल्यावरील तूपखान्याजवळील बुरुजावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. गिर्यारोहक पथकातील कृष्णा मरगळे, तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलासकर, नारायण जावळकर, संजय चोरगे, उत्तम पिसाळ, संतोष भगत आणि वैभव भोसले यांनी दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. या शोधमोहिमेत वनविभागाचे अधिकारी समाधान पाटील, बळीराम वायकर आणि संदीप कोळी यांनीही पथकाला सहकार्य केले. तरुणीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू खराडी परिसरात दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नरसिंग जमन्ना जंगले (वय 68, रा. पाटीलबुवानगर, खराडी) असे मृत्यमुुखी पडलेल्या पादचारी ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत नरसिंग यांचा मुलगा कृष्णा (वय 38) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग हे खराडीतील झेन्सार कंपनी रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने पादचारी नरसिंग यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नरसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed