साडीला इस्त्री करण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीचा विनयभंग:गोंदियातील सेवानिवृत्त प्राचार्याचे संतापजनक कृत्य; आरोपी फरार
![]()
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एका सेवानिवृत्त प्राचार्याने असे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पत्नीच्या साडीला इस्त्री करून देण्याची बहाण्याने आरोपीने मुलीला घरी बोलावले व गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. “माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस मारून दे” असे म्हणत आरोपीने जबरदस्तीने मुलीचा हात पकडून रूममध्ये नेले आणि पैशांचे आमिष दाखवून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे. या प्रकरणी देवरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ शहारेच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गेल्या 6 दिवसांपासून फरार असून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच लवकरच आरोपीला अटक होईल, असे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे 28 एप्रिल रोजी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सेवानिवृत्त प्राचार्याविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र घटनेला सहा दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पीडित मुलगी संबंधित प्राचार्यांच्या घरी भाड्याने चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असताना हा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या शोधासाठी विविध पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली असली, तरी आरोपीला अटक करण्यात होत असलेल्या विलंबामुळे संताप व्यक्त होत आहे. राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार आणि भोंदूबाबांच्या संतापजनक कारवायांमुळे सामाजिक मूल्यांच्या अध:पतनाची दाहकता समोर येत असतानाच, गोंदिया जिल्ह्यात एका सेवानिवृत्त प्राचार्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या गैरकृत्याने राज्याला पुन्हा एकदा हादरवून सोडले आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाच्या या वाढत्या घटना समाजाच्या ढासळत्या नैतिकतेचे गंभीर दर्शन घडवत असून, या ताज्या प्रकरणाने सर्वत्र तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
