अशोक खरातला 4 दिवसांची पोलिस कोठडी:खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलाने कोर्टाला दिली धक्कादायक माहिती
![]()
भोंदू अशोक खरातला आज 5 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी फिर्यादीच्या वकिलांनी अशोक खरातने आपल्या अशिलाला साप दाखवून मृत्यूची भीती दाखवल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष तपास पथकाने खरातचा ताबा घेतल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने खरातला राजेंद्र अशोक जासूद यांची 5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी फिर्यादी राजेंद्र जासूद यांच्या वकिलांनी अशोक खरातने आपल्या अशिलाला पूजा केली नाही तर मृत्यू अटळ असल्याचे सांगत फसवणूकी केल्याचा आरोप केला. मृत्यूची भीती दाखवत आर्थिक फसवणूक फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, राजेंद्र जासूद यांना त्यांचा लॉजिस्टिकच्या व्यवसायाचा जगभर विस्तार करायचा होता. त्यांनी याविषयी अशोक खरातचा सल्ला घेण्याचा विचार केला. ते त्यांच्याकडे गेले असता खरातने त्यांना अवतार पूजा करण्याचा सल्ला दिला. ही पूजा करण्यासाठी 3 देश फिरावे लागतील. त्यानंतर ईशान्येश्वर मंदिरात पूजा करावी लागेल, असे खरातने त्यांना सांगितले. तसेच ही पूजा केली नाही, तर तुझा मृत्यू अटळ आहे अशी भीतीही त्यांना दाखवली. त्यानंतर त्याने जासूद यांच्याकडून तब्बल 5 कोटी रुपये उकळले. एवढेच नाही तर पूजा करताना खरातने जासूद यांना नकली साप दाखवून घाबरवण्याचाही प्रयत्न केला. आरोपीने फिर्यादीला मृत्यूची भीती दाखवून मोठी आर्थिक फसवणूक केली. ईशान्येश्वर मंदिरात नेमकी कोणती पूजा सुरू होती? या पैशांचा विनियोग कुठे झाला? याचा तपास करण्यासाठी सरकारी पक्षाने अशोक खरातच्या 5 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर बचाव पक्षाने जोरदार हरकत घेतील. अशोक खरातच्या वकिलांचा युक्तिवाद काय? सुनावणीत अशोक खरातचे वकील म्हणाले, माझ्या अशिलाच्या (अशोक खरात) वावी पोलिसांत सर्वात पहिला गुन्हा दाखल केला होता. तो दिनेश परब व राजेंद्र जासूद विरोधात दाखल करण्यात आला होता. हा 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा होता. सरकारी पक्षाच्या युक्तिवादात वावीच्या या गुन्ह्याची कोणताही उल्लेख नाही. त्यानंतर नीरज जाधव नामक व्यक्ती पुढे आला. त्याने स्पाय कॅमेरा लावून व्हिडिओ चित्रित केले. ते सर्व व्हिडिओ त्याने दिनेश परबला दिले. या परबला हायकोर्टाने जामीन मंजूर केला, तर पोलिसांनी नीरज जाधवपुढे माफीचा साक्षीदार होण्याचा प्रस्ताव ठेवला. वावीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 महिन्यांनी जासूदला आपली फसवणूक झाल्याचे जाणवले. ते या प्रकरणी पैशाचा व्यवहार झाल्याचे सांगतात. या घटनेला महिना लोटल्यामुळे त्याचा तपास पूर्ण झाला असेल. त्यांनी आज सापाचा विषय काढला. तो यापूर्वीही चर्चेत होता. हे 3 देश फिरले. त्याचे फोटो दाखवले. ते आम्ही सहमतीने गेलो, एकत्र खर्च केला, असा दावा जासूद यांनी आपल्या जामीन अर्जात केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अशोक खरातला पुन्हा पोलिस कोठडी देण्याची गरज नाही, असे बचाव पक्षाचे वकील म्हणाले. अखेर कोर्टाने ठोठावली 4 दिवसांची पोलिस कोठडी अखेर न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक खरातला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आता पोलिस खरातने आणखी किती जणांची आर्थिक फसवणूक केली? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
