भाजपची साथ सोडली तरच विलिनीकरण शक्य:रोहित पवारांची NCP पुढे अट; बारामतीत 'पवार विरुद्ध पवार' लढत होण्याचेही दिले संकेत
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलिनीकरणाची तार छेडली आहे. पण यासाठी त्यांनी राष्ट्रवादीपुढे भाजपची साथ सोडण्याची अट ठेवली आहे. अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडली, तरच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चेचा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यात शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी स्वतः अजित पवारांनी विलिनीकरणासाठी पुढाकार घेतल्याचा दावा केला होता. पण त्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. दोन्ही पक्षांत अशी कोणतीही चर्चा सुरू असल्याची आपल्याला माहिती नव्हती अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे कालांतराने हा मुद्दा मागे पडला. पण आता आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घालत त्याला हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपची साथ सोडली तरच विलिनीकरण रोहित पवार यांनी आज अहिल्यानगरच्या कर्जत विधानसभा मतदार संघातील नागरी प्रश्नांवर आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, अजित पवार शेवटच्या टप्प्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भाजपच्या विरोधात बोलताना दिसत होते. पण आता सत्तेच्या राजकारणात त्यांचा पक्ष पुन्हा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार असेल, तर ह्या स्थितीत एकत्र येणे अत्यंत कठीण आहे. भाजपच्या विचारधारेसोबत गेलेल्यांना पुन्हा सोबत घेणे आमच्यासाठी शक्य नाही. अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडली, तरच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पवार विरुद्ध पवार सामना होणारच रोहित पवार यांनी यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढत होण्याचेही संकेत दिले. अजित पवारांचा पक्ष महायुतीत कायम राहिला आणि त्यांनी स्वतः उमेदवारी घेतली, तर महाविकास आघाडीकडून आम्हालाही पवार कुटुंबातीलच एखादा तगदा उमेदवार मैदानात उतरवावा लागेल. अशी परिस्थिती टाळायची असेल आणि पवार कुटुंबातील एकोपा टिकवायचा असेल, तर अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडणे हाच एमकेव मार्ग आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी दिवसांत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विसंवाद वाढणार की कमी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे खासदास सुप्रिया सुळे यांनी नुकतीच पवार आडनाव असलेल्यांविरोधात निवडणूक न लढण्याची भूमिका विषद केली होती. पण आता रोहित पवारांच्या भूमिकेमुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा एकदा होण्याची शक्यता वाढली आहे. काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे म्हणाल्या, गोविंदराव पवार व शारदाबाई पवार यांची जी नातवंडे, पवार आडनावाची आहेत, त्यांच्या विरोधात मी कधीही निवडणूक लढणार नाही. ही निवडणूक लढले नव्हते, याही निवडणुकीचा खूप इतिहास आहे. जो आता सांगणे गरजेचे वाटत नाही. मागच्या वेळेस तयारी आणि इच्छा बिल्कुल नव्हती, इथून पुढेही नसणार आहे. दुसरा मतदारसंघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, दुसऱ्या मतदारसंघात काम करेन. सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही स्वागत केले. सुप्रियाताईंनी पवार विरुद्ध पवार लढू देणार नाही हे केलेले वक्तव्य अतिशय चांगले आहे. आमची ही सगळ्यांची तीच इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या.
