गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

0
240_177754203869f323961b740_gramnathsanman.jpg




आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव, त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुजनगरी येथील महासमाधी परिसरात गुरुवारी ३० रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने हृदस्पर्शी ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपात साजरा करण्यात आला. ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुजनगरीत गावकऱ्यांनी पहाटे ग्रामस्वच्छता केली. दरम्यान तुकडोजी महाराज यांचा महासमाधी परिसर लक्षो लक्ष दिव्यांनी उजळण्यात आला होता. गुरुकुजातील तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत पहाटे पाच वाजता सामुदायिक ध्यानाने या ग्रामजयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. एक तास तुकडोजी महाराजांची भजने झाली. तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती यावेळी विशद करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक ध्यान व महाआरती पार पडली. यावेळी सीमा इंगळे यांनी सामुदायिक ध्यानानंतर चिंतन व्यक्त केले. मागील दीड महिन्यापासून श्री गुरुदेव महिला मंडळाच्यावतीने महासमाधी स्थळी ग्रामगीता पठण हा दैनंदिन कार्यक्रम पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून गुरुकुजातील महासमाधी परिसरात हा ग्रामजयंती महोत्सव सुरू आहे. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी गोपालकाला व महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी पं. शंकर वैरागकर यांच्या सुमधुर वाणीतून स्वरानंद संगीत संध्या, राष्ट्रसंतांचा भजन संदेश, प्रस्तुत करण्यात आला. भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमाची गुरुकुजातून शोभायात्रा काढण्यात आली. विलास महाराज साबळे यांचे गोपालकाला कीर्तन झाले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दळवी, उद्धव वानखडे, नंदकिशोर डीक्कर, सुहास टप्पे, अनिल चिखलकर, सागर रावणकर, सहभागी महिला मंडळ, ग्रामजयंती महोत्सव समिती व भाविकांनी अथक परिश्रम घेतले. शेतकऱ्यांचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती तीन दिवसीय आयोजित कार्यक्रमात, शेतात तिफन घेऊन राब -राब राबणारे शेतकरी लक्ष्मीकांत भाऊ पाचघरे (गुरुदेव नगर), रामजी देविदास सावंत (धोत्रा) श्रीकृष्ण उमप (मोझरी) यांच्यासह पाच ग्रामनाथ शेतकऱ्यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवांमडळच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी ग्रामनाथ हा शेवटच्या घटकापर्यंत तिफन घेऊन शेतात काम करतो. म्हणून कृषी प्रधान देशात शेतकऱ्याचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती असल्याचे मत बाबा पाटील उपसर्वाधिकारी अ. भा. गुरुदेव सेवामंडळ, यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पद्मश्री जनार्दनपंथ बोथे, गुलाब खवसे, बाबा पाटील, गोपाल कडू, अविनाश ठाकरे, दीपक वासनिक, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed