उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा मोठा धोका:'सबक्लिनिकल' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला

0
c9c3a5a4-5cee-488d-9792-4f1ea1721531_1777545293830.jpg




राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. उन्हाळ्यात मुलांमध्ये ‘डिहायड्रेशन’ (निर्जलीकरण) ही एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या म्हणून समोर येत आहे. अनेकदा पालक याकडे किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतात, मात्र हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा पुण्यातील वरिष्ठ नवजात शिशु तज्ञ आणि विभाग प्रमुख डॉ. तुषार पारिख यांनी दिला आहे. डॉ. पारिख यांच्या मते, शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रवांपेक्षा कमी द्रवाचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होते. ‘सबक्लिनिकल’ डिहायड्रेशन ही अशी स्थिती आहे, जिथे मुलाला तीव्र तहान लागल्याचे दिसत नाही, परंतु शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते. थकवा, चिडचिड किंवा भूक मंदावणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा पालक या लक्षणांना उन्हाळ्यामुळे होणारा सामान्य त्रास समजून दुर्लक्ष करतात, पण हे डिहायड्रेशनचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. मुलांच्या शरीरातून घामाद्वारे पाणी जलद गतीने बाहेर पडते. उन्हात जास्त वेळ खेळणे, पुरेसे पाणी न पिणे, तसेच ताप, उलट्या किंवा जुलाब यांसारख्या आजारांमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. शरीरात पुरेसे द्रव नसल्यास मुलांच्या शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि त्यांच्या वर्तनातही बदल दिसून येतात. डिहायड्रेशनमुळे मुलांना केवळ शारीरिक थकवाच येत नाही, तर डोकेदुखी, चक्कर येणे आणि अभ्यासातील एकाग्रता कमी होणे अशा समस्याही जाणवू शकतात. लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीचा रंग गडद होणे हा डिहायड्रेशनचा एक महत्त्वाचा संकेत आहे. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. पारिख यांनी पालकांना काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. मुलांना दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिण्याची सवय लावावी. त्यांच्या आहारात नारळपाणी, ताक आणि ताज्या फळांच्या रसांचा समावेश करावा. कलिंगड, संत्री, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे मुलांना द्यावीत. जंक फूड, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. मुलांना बाहेर पाठवताना हलके, सैल आणि सुती कपडे घालावेत, जेणेकरून घाम कमी येईल. तसेच, दुपारच्या कडक उन्हात मुलांना घराबाहेर खेळण्यापासून रोखावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed