एसीबीच्या 73 सापळ्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या:नागपूरमध्ये भ्रष्टाचारविरोधात 'झिरो टॉलरन्स'ची प्रभावी अंमलबजावणी

0
f63336ad-9d00-4b2b-85ff-6030e0b307e0_1777539646633.jpg




नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत एसीबीने सन २०२५ आणि २०२६ या कालावधीत विविध विभागांमध्ये तब्बल ७३ सापळा कारवाया केल्या आहेत. या कारवाईत अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एसीबीने महसूल, पोलीस, ग्रामविकास, वन, शालेय शिक्षण, कृषी, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद, नगरविकास, पंचायत समिती, आदिवासी विकास, नोंदणी, भूमी अभिलेख, विक्रीकर आणि सहकार यांसारख्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या शासकीय विभागांमध्ये धडक कारवाई केली आहे. यामुळे भ्रष्टाचाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. विशेषतः प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) लाचखोरीच्या प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. एसीबीने या विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील दोन वर्षांत आरटीओ विभागात ७ सापळा कारवाया करण्यात आल्या असून, यात वर्ग-१ चे ५ आणि वर्ग-२ चे २ अधिकारी अटकेत आहेत.एसीबीने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या या कारवाया कोणत्याही राजकीय दबावाशिवाय, पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने केल्या जात आहेत. तक्रार प्राप्त होताच तिची शहानिशा करून अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला जातो, ज्यामुळे आरोपींना रंगेहात पकडण्यात यश मिळते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास घाबरू नये. नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी. भ्रष्टाचारविरोधातील या लढ्यात जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे विभागाने नमूद केले आहे. तक्रार नोंदवण्यासाठी एसीबीने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed