उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार
![]()
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाने २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम विदर्भात उष्णतेची तीव्रता विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. दुपारच्या सत्रात परीक्षा देताना विद्यार्थ्यांना उष्णतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासात उष्माघात, थकवा आणि डिहायड्रेशनसारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने परीक्षांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी करावी, असा प्रस्ताव सिनेटर अमोल देशमुख यांनी दिला आहे. शिक्षण विभागाने शाळांच्या वेळांत बदल केला असून, अनेक शासकीय कार्यालयांनीही कामकाजाच्या वेळेत आवश्यक बदल केले आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता हा बदल महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास कमी होऊन ते अधिक चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी त्यांची विनंती आहे. यापूर्वी, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सरकारी आणि खाजगी शाळा सकाळी ७ ते १० या वेळेत भरवण्याचे निर्देश दिले आहेत. याच धर्तीवर विद्यापीठानेही दुपारच्या सत्रातील परीक्षा सकाळी घेण्याचे नियोजन करावे, असे अमोल देशमुख यांचे म्हणणे आहे.
