शिर्डीत राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलनात फुलला भक्तीचा मळा:प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले
![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत २८ वे राष्ट्रसंत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. साहित्याच्या या महाकुंभात राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांनी शब्दांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण केली. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आचार्य डॉ. शंकर अंदाणी होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुमन देसाई, पुरस्कार वितरण अध्यक्ष माया नवथर आणि आयोजक विलास पाटील (कोल्हापूर) आदि व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलनातील कथाकथन सत्रात कथालेखक बाळासाहेब देशमुख यांनी सादर केलेल्या ‘तो भावभक्तीचा भुकेला’ या धार्मिक कथेने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. संसारात राहूनही भक्ती कशी जोपासावी, याचे जिवंत चित्रण त्यांनी रेखाटले.देशमुख यांनी आपल्या कथेतून ‘श्रद्धा डोळस असावी, बेगडी नको’ हा संदेश दिला. शबरीची उष्टी बोरे आणि सुदाम्याचे पोहे या उदाहरणांतून भगवंत केवळ भक्तीचा भुकेला असतो, हे त्यांनी प्रभावीपणे मांडले. सूत्रसंचालन साहित्यिक रंगनाथ वाडेकर यांनी केले.
