एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त
![]()
देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे संबोधले आहे. तसेच यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चांवरही आश्चर्य व्यक्त केले. संजय राऊत म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसारखे खंबीर नेतृत्व असताना, त्यांना हरवण्यासाठी मोदी-शाहांनी संपूर्ण यंत्रणा राबवली. अडीच लाख निमलष्करी दल तिथे नेऊन ठेवले. जर उद्या अंतराळात राजकारण सुरू झाले, तर मोदी तिथलेही नेते होतील. पण त्यांना राज्या-राज्यात पोलीस फोर्स नेऊन, लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकाव्या लागत आहेत. याचाच अर्थ त्यांना स्वतःचा पराभव स्पष्ट दिसत आहे. पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी हे सर्व उपद्व्याप सुरू आहेत.” निवडणूक आयोगावर गंभीर आरोप निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “देशाच्या लोकशाहीत ही अत्यंत गंभीर गोष्ट घडत आहे. निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नसून, तो सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतीचा अवलंब करत आहे. प्रशासनाचा आणि आयोगाचा वापर करून निवडणुका जिंकणे हा लोकशाहीचा खून आहे,” अशी टीका त्यांनी केली. विधान परिषद: ‘मविआ’चा एकच उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “इतर पक्षांनी आपापल्या याद्या जाहीर केल्या असतील, मात्र महाविकास आघाडीचा (MVA) या जागेसाठी एकच उमेदवार असेल. आम्ही सर्व मिळून एकच अर्ज भरणार आहोत. तो उमेदवार कोण असेल, हे उद्या सकाळी ११ वाजता स्पष्ट होईल.” बच्चू कडूंवर कोणता दबाव? आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणावर राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, “ज्या पद्धतीने देशभरातीत राजकारण सुरू आहे. ज्या पद्धतीने दशहतवादाचा वापर करून, लोकांवर दबाव आणून, आमिष दाखवून माणसांना बाजुला केले जात आहे. पक्ष फोडणे हा डरपोकपणा आहे. आता बच्चू कडूंवर कोणता दबाव आहे? हे मला माहीत नाही. बच्चू कडू एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकरी, दिव्यांगांसाठी लढणारा नेता असे मी मानतो. आता एका आमदरकीसाठी कुणी आपला पक्ष कोणात विलीन करत असेल, तर त्यावर नंतर बोलू,” असे संजय राऊत म्हणाले.
