संभाजीनगरात 5 वर्षांपासून सुरू अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश, 4 अटकेत:माणुसकीला काळिमा 10वी पास महिला 15 हजारांत करायची गर्भपात
![]()
रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन चालवण्यात येत असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी सोमवारी (२७ एप्रिल) मध्यरात्री छापा टाकून पर्दाफाश केला. केंद्र चालवणारी शाहेदा परवीन गर्भपातानंतर गर्भ थेट खिडकीतून पाठीमागच्या नाल्यात फेकत होती. तेथे टपून बसलेली भटक्या कुत्र्यांची टोळी गर्भाचे लचके तोडून विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सजग महिलेने पोलिस आयुक्तांना फोन करून याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी ४ जणांना अटक केली असून त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद ( ५१), सय्यद इर्शाद अहमद सय्यद गनी ( ६१, दोघे रा. प्लॉट नं. १६, खमर व्हिला, रशीदपुरा), नसरीन नजीर शेख ( ४७, रा. बीएफसी शाळेजवळ, सहारा कॉम्प्लेक्स, आझाद चौक) आणि मीनाक्षी मंगेश थोरात ( ३५, रा. सिनाई समर्थ रेसिडेन्सी, जटवाडा रोड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. उर्वरित स्पोर्ट््स (संबंधित पान.३) इनसाइड स्टोरी – गर्भपाताच्या पैशांवर शाहेदाच्या मुलाचे लंडनमध्ये शिक्षण शाहेदा मूळची जुन्या शहरातीलच रहिवासी आहे. १५ वर्षांपूर्वी ती एका प्रसूतिगृहात दाई म्हणून डॉक्टरांच्या हाताखाली काम करायची. तेथेच तिने डॉक्टरांचे निरीक्षण करून गर्भपाताचे तंत्र आत्मसात केले. गेल्या ५ वर्षांपासून ती हा गोरखधंदा चालवत आहे. पोलिसांना किंवा आजूबाजूच्यांना संशय येऊ नये म्हणून ती शहरात सतत घरे बदलत होती. या वेळी तिने चक्क एका निवृत्त न्यायाधीशांच्या बंगल्यात राहत होती. महिन्याकाठी १२ ते १५ गर्भपात ती करत होती. याच काळ्या पैशांवर तिचा एक मुलगा सध्या लंडन येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून नोकरीही करत आहे. मुलीचे लग्न एका व्यावसायिकाशी झाल्याची माहिती आहे. सोनोग्राफी मशीनसह थेट रुग्णांच्या घरी या रॅकेटची पाळेमुळे शहरासह ग्रामीण भागातही पसरलेली आहेत. यातील फरार आरोपी मंगेश थोरात हा एजंट म्हणून काम करायचा. तो आणि त्याची पत्नी मीनाक्षी हे दोघेही वैद्यकीय शिक्षण नसताना चक्क पॅथॉलॉजी लॅब चालवत होते. मंगेश हा ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या संपर्कात होता. तेथून तो पेशंट आणायचा. या साखळीतील तोतया डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन थेट रुग्णांच्या घरी जायचे आणि लिंगनिदानासाठी ४५ ते ५० हजार रुपये उकळायचे. गर्भ ‘स्त्री’ जातीचा असल्याचे सांगत मीनाक्षी त्या गर्भवतीला शाहेदाकडे रशीदपुऱ्यात घेऊन यायची. शाहेदा गर्भपातासाठी १५ हजार रुपये घ्यायची.
